डॉ. जिनदत्त देसाई : भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : उत्तर कर्नाटकातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था भरतेश एज्युकेशन ट्रस्ट यंदा संस्था ६० व्या वर्षांत पदार्पण करत आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जिनदत्त देसाई यांनी सांगितले. शुक्रवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. १७ जानेवारीपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेचे संचालक विनोद दोडण्णवर म्हणाले, १७ जानेवारी रोजी डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कूलचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व शाळेचा हीरकमहोत्सव साजरा होणार आहे. या शाळेत आतापर्यंत सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून या सर्वांची नोंदणी करण्याचा मानस आहे. शाळेचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध कन्नड अभिनेते चरणराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
१८ रोजी अपर्णा भट्ट आणि टीमद्वारे आध्यात्मिक संगीताचा कार्यक्रम होणार आहे. १९ रोजी पद्मराज अरिगा भरतेश कॉलेज ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन महाविद्यालयाचा रौप्यमहोत्सवी सोहळा होणार आहे. २० रोजी प्रसिद्ध बॉलीवूड गायक सचेत आणि परंपरा यांचा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. सर्व कार्यक्रम भरतेश शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष राजीव दोडण्णावर, सचिव श्रीपाल खेमलापूर, मंडळाचे सदस्य भूषण मिर्जी, प्रकाश उपाध्ये, अशोक दानवडे, हिराचंद कालमणी, डॉ. सावित्री दोडण्णावर, वसंत कोडचवाड उपस्थित होते.