खानापूर : येथील मराठा मंडळ संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील कॉमर्स फोरम (वाणिज्य संघ), माजी विद्यार्थी संघटना, इंडियन डेंटल असोसिएशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी, दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. होनकल ता. खानापूर येथील सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा मराठा मंडळ महाविद्यालयाच्या कॉमर्स फोरमने दत्तक घेतली असून या अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जे. के. बागेवाडी होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. व्ही. एम. तिर्लापूर यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठा मंडळ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एस. जी. सोन्नद उपस्थित होते. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे महत्त्व उपस्थितांना पटवून देत “आम्ही ज्या भूमीत जन्मतो त्या भूमीप्रती ऋण फेडण्यासाठी मराठा मंडळ महाविद्यालयाच्या कॉमर्स फोरमने होनकल येथील शाळा दत्तक घेतली आहे. हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.” असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक फोरमचे अध्यक्ष प्रा. कर्लेकर यांनी केले. सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संघटनेच्या सेक्रेटरी श्रीमती जे. व्ही. बनोशी यांनी केले. तर आभार कॉमर्स फोरमचे सेक्रेटरी श्री. आय. बडगेर यांनी व्यक्त केले. इंडियन डेंटल असोसिएशन खानापूर शाखाप्रमुख डॉ. राधाकृष्ण हेरवाडकर, डॉ. ऐश्वर्या चव्हाण, डॉ. तन्वी, डॉ. विशाखा मेटगुड आदींनी आरोग्य तपासणी, दंत तपासणी शिबिरात महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी वर्ग, होनकल गावचे ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.