बेळगाव : विश्व भारत सेवा समितीच्या हिंडलगा हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. हायस्कूलच्या क्रीडांगणावर झालेल्या या स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते आर. एम. चौगुले, आर. आय. पाटील, विश्वभारत सेवा समितीचे संचालक बी. बी. देसाई, निवृत्त मुख्याध्यापक पी. के. तरळे, माजी जिल्हा पंचायत सदस्या प्रेमा मोरे आदी उपस्थित होते.
क्रीडा ज्योतीचे स्वागत केल्यानंतर कार्यक्रमाला रीतसर सुरुवात झाली. मुख्याध्यापक रवी तरळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धातून राज्य पातळीपर्यंत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना बी. बी. देसाई यांनी खेळाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच नियमितपणे व्यायाम करण्याचे आवाहन केले. माजी आमदार मनोहर किणेकर, आर. आय. पाटील, आर. एम. चौगुले, श्री. तुडयेकर यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली.
आर. आय. पाटील व चौगुले यांच्या हस्ते क्रीडांगणाचे पूजन करून क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. एल. व्ही. शिंदे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक सुभाष मिलके व इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास अनिल हेगडे, रामचंद्र कुद्रेमणीकर विनायक पावशे, महादेव तेळवेकर, राजेश पाटील आदी उपस्थित होते.