बेळगाव : वडगाव येथील सरकारी चावडी दिवसेंदिवस अधिकच समस्यांच्या विळख्यात गुरफटत चालली आहे. चावडी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. सततच्या पावसामुळे चावडीच्या प्रवेशद्वाराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यापुढे पाऊस जास्त प्रमाणात झाल्यास चावडीत प्रवेश करण्यासाठी नागरिकांना एखाद्या बोटीचा वापर करावा लागेल की काय?अशी काहीशी स्थिती सध्या चावडी परिसरात पाहायला मिळत आहे.
जनावरांचा दवाखाना देखील या चावडीतच आहे. या परिसरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून शेतकरी बांधवाना चावडीत प्रवेश करणे कठीण बनले आहे. सध्या चावडीत शेती उताऱ्याला आधार जोडणी काम चालू आहे. यासाठी चावडीत शेतकऱ्यांची सतत ये-जा चालू असते परंतु परिसरात असलेले घाणीचे साम्राज्य आणि मुख्य प्रवेशद्वारावर साचलेले तलावसदृश्य डबके यामुळे नागरिकांना चावडीत जाणे मुश्कील बनले आहे. तसेच या साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होऊन डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड सारखे रोग होण्याची शक्यता आहे. तरी सबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन चावडी परिसरातील स्वच्छता करवून घ्यावी अशी मागणी वडगाव भागातील शेतकऱ्यांसह नागरिक करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta