बेळगाव : जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही क्रीडा भारती व पतंजली योग समिती यांच्या विद्यमाने सूर्यनमस्काराचे आयोजन बालिका आदर्श शाळेच्या मैदानावर सकाळी साडेसहा वाजता करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रोफेसर आनंद गाडगीळ हे होते. यावेळी व्यासपीठावर क्रीडा भारतीचे कर्नाटक राज्य सचिव श्री. अशोक शिंत्रे, ऍड. सुधीर धामणकर, क्रीडा भारती उत्तर प्रांताचे सहकार्यवाह श्री. विश्वास पवार व पतंजली योग समिती बेळगाव प्रमुख श्री. किरण मनोळकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात किरण मनोळकर यांनी अग्निहोत्राने केली. यानंतर प्रोफेसर आनंद गाडगीळ यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन केले. श्री. अशोक शिंत्रे व सुधीर धामणकर यांनी दीप प्रज्वलन केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये श्री. अशोक शिंत्रे यांनी क्रीडा भारतीची माहिती सांगून गेल्या पंधरा वर्षापासून क्रीडा भारती व पतंजली योग समितीतर्फे जागतिक सूर्यनमस्काराचे आयोजन बेळगाव मध्ये विविध शाळांमधून करण्यात येते असे सांगितले. प्रमुख पाहुणे प्रो. आनंद गाडगीळ यानी सूर्यनमस्काराबद्दल माहिती सांगून नियमितपणे सूर्यनमस्कार घातल्याने शरीर सुदृढ व बळकट होते, सूर्याची उपासना केल्याने अनेक रोगांचे उच्चाटन होते यासाठी विद्यार्थ्यानी नियमितपणे सूर्यनमस्कार घालून शरीर सुदृढ व निरोगी बनवावे असे सांगितले. यानंतर श्री. किरण मनोळकर यांनी योगा प्राणायाम व सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थित विद्यार्थ्याकडून करून घेतले. क्रीडा भारतीच्या विद्यार्थ्यांनी 108 सूर्यनमस्कार घातले. यावेळी क्रीडा भारती कोषाध्यक्ष श्री. परशराम मंगनाईक, चंद्रकांत पाटील, उमेश बेळगुळकर, आनंद पाटील, उमेश कुलकर्णी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश बेळगुंदकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. विश्वास पवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली.