बेळगाव : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याहून परतताना बेळगावातील चार जणांसह शुक्रवारी सकाळी मध्य प्रदेशातील इंदूरजवळ झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा बेळगाव शहर हळहळले आहे. आता पुन्हा या दुर्दैवी अपघाताने चार बळी घेतल्यामुळे अवघ्या शहरावर शोककळा पसरली आहे. या अपघातात इंदूर येथील स्थानिक असणाऱ्या आणखी दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बेळगावातून एक मिनी बस करून उज्जैनसह प्रयागराज येथे हे भाविक प्रवासाला निघाले होते.
सागर आणि नीतू नावाच्या बेळगावच्या दोघांनी उपचारादरम्यान जीव सोडला होता. मयतात बेळगाव येथील 3 महिला एक पुरुष असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बेळगावचे चारी मयत गणेशपुर, शिवाजी नगर, होसुर आणि वडगाव भागातील आहेत असेही समजते.
अपघातातील जखमींची नांवे देखील स्पष्ट समजू शकली नसली तरी जखमींमध्ये तुकाराम (वय 40), त्यांची पत्नी सविता (वय 35), शीतल (वय 27) श्रुती (वय 32), शिवसिंग (वय 31), बबीता (वय 56), राजू (वय 63), सुनिता (वय 50), प्रशांत (वय 52), शंकर (वय 60), लता (वय 62) आदींचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव येथील काही भाविक प्रयागराज येथील कुंभमेळ्यात सहभागी होऊन काल गुरुवारी आपल्या ट्रॅव्हलर वाहनाने बेळगावला परत येण्यासाठी निघाले होते.
त्यावेळी मध्यप्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील मानपुर येथील भेरू घाट येथे उतारावर एका दुचाकीला ठोकरल्यानंतर नियंत्रण सुटलेल्या ट्रॅव्हलरने (क्र. डीडी 01 एक्स 9889) पुढे रस्त्या कडेला थांबलेल्या टँकरला (एमपी 08 एचजी 8024) जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की ट्रॅव्हलर मध्ये चौघेजण जागीच गतप्राण झाले होते.
अपघाताची माहिती मिळताच मानपुर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन प्रथम मदत कार्य हाती घेतले त्यानंतर अपघाताचा पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे.