कडोली : येथील मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे रविवार ता. 16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता वक्तृत्व, निबंध लेखन व सुंदर हस्ताक्षर या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवाजी हायस्कुल, कडोली येथे या स्पर्धा होतील.
प्राथमिक (पहिली ते सातवी) आणि माध्यमिक (आठवी ते दहावी) अशा दोन गटात ही स्पर्धा होईल. निबंध स्पर्धेसाठी दोन्ही गटांना प्रत्येकी 30 मिनिटे वेळ दिला जाईल. हस्ताक्षर स्पर्धेसाठी उतारा दिला जाणार असून तो बघून 20 मिनिटात लिहावयाचा आहे. वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक गटासाठी 5 मिनिटे व माध्यमिक गटासाठी 7 मिनिटे वेळ देण्यात येईल. निबंध व हस्ताक्षर स्पर्धेसाठी आयोजकांकडून कागद पुरवीला जाईल. निबंध कागदाच्या एका बाजूस लिहावयाचा आहे.
प्राथमिक गट निबंध स्पर्धेसाठी माझी शाळा, माझा आदर्श, माझी आई आणि माझा गाव असे चार विषय आहेत. तर प्राथमिक वक्तृत्व स्पर्धेसाठी जय जवान-जय किसान, संत विचार, शिक्षणाचे महत्व आणि पाण्याचे महत्व असे विषय देण्यात आले आहेत.
माध्यमिक गट निबंध स्पर्धेसाठी माझी माय मराठी, परीक्षेला सामोरे जाताना, माझा आवडता राष्ट्रपुरुष आणि स्वच्छ भारत सुंदर भारत असे चार विषय आहेत. माध्यमिक वक्तृत्व स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा, मोबाईल शाप की वरदान, देश माझा मी देशाचा आणि निसर्ग माझा सांगाती असे चार विषय दिले आहेत.
दोन्ही गटातील व प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांचा रोख रक्कम व पुस्तके भेट देऊन सन्मान करण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी ता. 15 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणी प्रा. बाबुराव नेसरकर, रेणुका क्वालिटी स्पोर्ट्स, अनसुरकर गल्ली, बेळगाव (मो. क्र. 9448192570) किंवा संतोष देसाई, विनायक मेडिकल्स, बस स्थानकाजवळ, कडोली (मो. क्र. 6363525966) येथे करावी असे आवाहन मराठी साहित्य संघातर्फे करण्यात आले आहे.