बेळगाव : धर्मनाथ सर्कल नेहरूनगर परिसरात खाजगी ट्रॅव्हल्स वाहनांनी चक्क पदपथावर अतिक्रमण केल्याचे पहावयास मिळत आहे. धर्मनाथ सर्कल येथे पुणे-मुंबई-बेंगलोर या ठिकाणी प्रवास करणाऱ्या खाजगी गाड्या असतात. या गाड्या रात्रीचा प्रवास करतात आणि दिवसभर पदपथावर उभ्या केल्या जातात. त्यामुळे पादचार्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या प्रकाराकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शहरात वाहतुकीचे काही नियम आहेत हे नियम सर्वांसाठी सारखे असावे. सामान्य नागरिकांवर कारवाई आणि मोठ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांना मुभा अशी भूमिका का असा प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करीत आहेत. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून पदपथांवरील बेकायदेशीर पार्किंग हटवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
धर्मनाथ सर्कल हे शहरातील वर्दळीचे ठिकाण आहे. या परिसरात अनेक शाळा व महाविद्यालय आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ या भागात असते. ट्रॅव्हल्स कंपन्यांची खाजगी वाहने पदपथांवर उभी असल्यामुळे विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करावी लागते. हा रस्ता वर्दळीचा असल्यामुळे लहान मोठे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. एरवी शहरात वाहतूक पोलिसांकडून दुचाकी चालक व चारचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते मात्र या खाजगी कंपन्यांच्या वाहनांवर वाहतूक पोलिसांची कृपादृष्टी का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.