Monday , April 20 2026
Breaking News

मालमत्तेच्या हव्यासापोटी वकिलांकडूनच वकिलाचे अपहरण करून खून; रायबाग तालुक्यातील घटना

Spread the love

 

रायबाग : मालमत्तेच्या हव्यासापोटी वकिलांनीच एका वकिलाचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात घडली असून या प्रकरणात एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे तर फरार असलेल्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आज बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

२९ एप्रिल रोजी संतोष पाटील या वकिलाच्या पत्नी रेखा संतोष पाटील यांनी रायबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वकील शिवगौडा पाटील आणि भरत कोळी यांनी रायबाग येथील वकील संतोष पाटील यांचे अपहरण केल्याचे तक्रारीत नमूद होते. अथणीचे उपअधीक्षक आणि रायबाग पोलिसांनी पुरावे गोळा करून तपास केला असता, संशयित आरोपी उदयकुमार याने सत्य कबूल केले. उदयकुमारने उर्वरित आरोपी संजय वन्नूर, रामू दंडापुरे, मंजुनाथ तलवार आणि बसप्पा नायक यांची माहिती दिली. अपहरण केलेल्या दिवशीच धारदार शस्त्रांनी हल्ला करून वकील संतोष पाटील यांचा खून करण्यात आला होता आणि मृतदेह कारवार जिल्ह्यातील रामनगरच्या जंगलात जाळण्यात आला होता, असे तपासात समोर आले आहे. अनेक दिवसांच्या शोधमोहिमेनंतर सापडलेल्या अवशेषांची अवघ्या ४८ तासांत डीएनए चाचणी केली असता, जळालेला मृतदेह संतोष पाटील यांचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. खुनाचे कारण स्पष्ट करताना जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, मृत वकील संतोष पाटील यांचा भाऊ लक्ष्मण पाटील हा ज्येष्ठ वकील शिवगौडा पाटील यांच्याकडे सहायक म्हणून काम करत होता. हे दोघेही दिवाणी वादातील मालमत्ता खरेदी करत असत. विजयपूर जिल्ह्यातील इंडी येथे लक्ष्मण पाटील यांच्याकडे ६ भूखंड आणि १ एकर ४ गुंठे जमीन होती. मात्र, लक्ष्मणच्या अकाली निधनानंतर संतोषने ही मालमत्ता आपल्या वहिनीच्या नावावर हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी शिवगौडा यांनी त्यांचे ज्युनियर वकील किरण केंपवाडे यांच्या मदतीने खुनाचा कट रचल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शिवगौडा पाटील, भरत कोळी, किरण केंपवाडे, सुरेश नंदी, उदय मुशेनवर, संजयकुमार हलबाणावर आणि रामू दंडापुरे यांना अटक करण्यात आली आहे. फरार असलेले महावीर हंजे आणि नागराज नायक या दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू असल्याची माहिती डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

चित्ररथ मिरवणुकीस नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात

Spread the love  बेळगाव : मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *