

बेळगाव : रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाच्या कार्यतत्परतेमुळे एका 55 वर्षीय प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. बेळगाव रेल्वे स्थानकात चालत्या गाडीतून पडणाऱ्या प्रवाशाचे आरपीएफ जवानाने प्राण वाचवले. त्याच्या या धैर्याचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. गाडी क्रमांक 16210 मैसूर अजमेर एक्सप्रेसमधून एका प्रवाशाचा स्लीपर कोच मधून उतरत असताना तोल जाऊन प्लॅटफॉर्मवर पडल्याची घटना घडली. आर पी एफ हेडकॉन्स्टेबल सी. आय. कोप्पड हे बेळगाव रेल्वे स्थानकावर आपली सेवा बजावत होते. चालत्या गाडीतून प्रवाशाचा तोल गेल्याचे निदर्शनास येताच प्रसंगावधान राखत धावत जाऊन त्यांनी प्रवाशांना सुखरूप खेचून घेतले त्यामुळे एक भीषण अपघात टाळला. याबाबत समजलेली माहिती अशी की, बसुर्ते उचगाव येथील भरमा गंगाराम कुंबर हे आपली नात लक्ष्मी हिला पुण्याला जाण्यासाठी निरोप द्यायला आले होते. गाडीत चढून निरोप दिला आणि गाडी सुरू होताच उतरण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचा पाय घसरला हेड कॉन्स्टेबल कोप्पड यांच्या धाडसामुळे व कार्यतत्परतेमुळे एका प्रवाशाचे प्राण वाचले असून त्यांना सौम्य दुखापत झाली आहे. जखमी प्रवाशाला तात्काळ रेल्वे स्थानकावर प्राथमिक उपचार देण्यात आले रेल्वे प्रशासनाने हेड कॉन्स्टेबल कोप्पड यांच्या तत्परतेचे आणि धाडसाचे कौतुक केले आहे. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी घडली असून त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta