प्रा. दिपक पाटील; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ग्रामीण भागात लग्नासाठी शेतकरी मुलगा नको, अशी नकारात्मकता वाढत आहे. त्यामुळे शेतकरी युवकांना लग्नासाठी मुली मिळणे मुश्किल झाले आहे. विवाह न झाल्याने त्यांच्यात नैराश्य वाढत आहे. अशा अविवाहित ३० वर्षांवरील युवकांना महाराष्ट्र शासनाने दहा लाखांची आर्थिक मदत करून त्यांना बळ द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे. सध्या मुली नोकरी असलेल्या मुलांना प्राधान्य देतात. पण शिकून शेती व्यवसायात राहिलेल्या शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली देण्याला कुणीही पुढे येत नसल्याचे चित्र निर्माण होत आहे. शेतकरी मुलांना लग्नासाठी वर्षानुवर्षे मुली बघण्यात घालावे लागत आहे. ३० ते ४० वर्षे उलटून गेली तरी काही युवक लग्न जुळविण्यासाठी धडपडत आहेत. लग्न ठरत नसल्याने या शेतकरी युवकांत नैराश्य, व्यसनाधीनता वाढत आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर परिणाम होत आहे. शासन नोकरदार, उद्योजकांना अनेक स्तरावर मदत करते. त्याप्रमाणे विवाह न झालेल्या तीस वर्षांवरील अविवाहित युवकांना शासनाने १० लाखांची आर्थिक मदत करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta