नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल आता हळूहळू स्पष्ट होत आहेत. समोर येत असलेल्या आकडेवाडीत भारतीय जनता पक्ष बहुमत मिळविण्यापासून दूर दिसत आहे. तसेच एनडीएची गाडीही 300 च्या आकडेवारी थांबत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलुगू देसम पार्टी म्हणजेच टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधल्याची बातमी समोर येत आहे. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत टीडीपीही मोठ्या विजयाच्या मार्गावर आहे आणि एनडीएचा भाग आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी चंद्राबाबू नायडू यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आहे. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लोकसभा निवडणुकीआधी चंद्राबाबू एनडीएमध्ये परतले होते. आंध्र प्रदेशमध्ये भाजप पवन कल्याण यांच्या जनसेना आणि टीडीपीसोबत आघाडी करून निवडणूक लढवत आहे. चंद्राबाबू नायडू यांच्याशिवाय पंतप्रधान मोदींनी लोक जनशक्ती पार्टी रामविलास आणि जनता दल (युनायटेड) यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नितीश कुमार यांची बार्गेनिंग पॉवर वाढणार?
दरम्यान, भाजप बहुमतापासून दूर असल्याने आता एनडीएमध्ये बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांची बार्गेनिंग पॉवर वाढण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत जेडीयू चांगली कामगिरी करताना दिसत आहे. येथे जेडीयू 15 जागांवर आघाडीवर आहे. यातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी नितीश कुमार यांना फोन केल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच नितीश कुमार इंडिया आघाडीत आले तर त्यांना उपपंतप्रधानपद देणार असल्याच्या चर्चा आहे.