जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील; निपाणीत शांतता समितीची बैठक
निपाणी (वार्ता) : हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण गुरुवारी (ता. २९) साजरा होत आहे. आतापर्यंत निपाणी शहर आणि परिसरात हिंदू आणि मुस्लिम समाज बांधव सामाजिक सलोखा राखून दोन्ही सण शांततेने साजरा करीत आहेत. पण आता काही विघ्नसंतोषी लोकांकडून समाज माध्यमावर अफवा पसरून सामाजिक तेढ निर्माण करीत आहेत. त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर असून हिंदू मुस्लिम बांधवांनी सामाजिक सौहार्दता जपत दोन्ही सण साजरे करावेत,असे आवाहन बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी केले. बकरी ईद आणि आषाढी एकादशी सणाच्या पार्श्वभूमीवर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समुदाय भावना रविवारी (ता.२५) सायंकाळी आयोजित शांतता बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
डॉ. संजीव पाटील म्हणाले, सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारच्या घटना व्हायरल करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत बकरीच्या पार्श्वभूमीवर संबंधित समाजप्रमुखांनी जबाबदारी घेऊन किरकोळ घटना तात्काळ मिटवून सहकार्य करावे. एखादी अप्रिय घटना घडल्यास कुणीही कायदा हातात न घेता तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. त्यामुळे सणांमध्ये होणारी बाधा नाहीशी होऊन दोन्ही सण शांतता आणि समाधानाने होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
चिक्कोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज यलिगार यांनी, हिंदू आणि मुस्लिम समाजाचे दोन्ही सण एकत्र आले आहेत. या काळात काही समाजकंटकाकडून सणाला बाधा पोचण्याच्या घटना होऊ शकतात. अशा काळात संयम बाळगून अनिष्ट शक्तींना थारा देऊ नये. त्यासाठी निपाणी विभागातील पोलीस यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी शांतता आणि सुव्यवस्थे नुसार दोन्ही सण साजरी करावेत.
यावेळी प्रा. सुरेश कांबळे, जरारखान पठाण, विजय मेत्रांणी, झाकीर कादरी, रवींद्र श्रीखंडे, बक्तीयार कोल्हापुरे, मारुती कामगौडा यांनी मनोगत व्यक्त करून दोन्ही सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले.
प्रारंभी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी स्वागत केले.
बैठकीस नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी, मैनुद्दीन मुल्ला, नाशिखान इनामदार, नवनाथ चव्हाण, विवेकानंद सोळांकुरे, चंद्रकांत मुधाळे, यांना ग्रामपंचायत अध्यक्ष संजय पाटील, संदीप इंगवले, अस्लम शिकलगार, शशी नेसरे, विजय दावणे, जुबेर बागवान,नंदकुमार कांबळे, युनूस मुल्ला, रेहान मुल्ला, फारुख गवंडी, दस्तगीर आत्तार, विश्वास कुंभार, सहाय्यकउपनिरीक्षक डी. बी.कोतवाल, उपनिरीक्षक रमेश पोवारयांच्यासह निपाणी शहर व ग्रामीण भागातील हिंदू मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी यांनी आभार मानले.