


निपाणी (वार्ता) : सध्या सर्वत्र विविध पिकांचा सुगीचा हंगाम सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर आणि ग्रामीण भागात वासुदेवाची पारंपारिक वेशभूषा करून सुगी मागण्यासाठी वासुदेव समाजातील नागरिक परिसरात दाखल झाले आहे.
लातूर जिल्ह्यातील एकनाथ पांडुरंग शिंदे (दाळंबी) यांनी वासुदेवाची पारंपरिक वेशभूषा धारण करून गावोगावी पुरून जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.. डोक्यावर मोरपिसांनी सजविलेली शंकूच्या आकाराची उंच टोपी (मुकुट), अंगात पांढरा पायघोळ कुर्ता, धोतर, कमरेला रंगीत पटका, खांद्यावर भिक्षेसाठीची कापडी झोळी आणि पायात घुंगरू अशी त्यांची वेशभूषा आहे.
एका हातात चिपळ्या, तर दुसऱ्या हातात टाळ घेत त्यांनी शंखनाद करत ते भटकंती करीत आहेत. वासुदेवाची पारंपरिक ओळख जपताना त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत एकनाथ महाराजांचे अभंग, गवळणी तसेच भक्तिगीते सादर करत नागरिकांना मंत्रमुग्ध करून सोडत आहेत ‘वासुदेव आला हो… वासुदेव आला’ आणि ‘दान पावलं’ अशी पारंपरिक गाणी म्हणत ते जुन्या काळातील वासुदेवाच्या परंपरेची आठवणींना उजाळा देत आहेत. यावेळी त्यांना काही नागरिक धान्य तर काहीजण रोख रक्कम देतांना दिसत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta