फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने धुव्वा
नवी दिल्ली : मलेशियात आयसीसी महिला अंडर १९ टी-२० वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते.
या सामन्यात भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी अवघे ८३ धावांचे सोपे लक्ष्य होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ११.२ षटाकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं आणि सलग दुसऱ्यांदा अंडर १९ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेवर नाव कोरलं आहे.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दक्षिण आफ्रिकेचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. माईक वॅन वोर्स्टने सर्वाधिक २३ धावांची खेळी केली. तर सलामीला फलंदाजी करताना जेम्मा बोथाने १३, फे कोवलिंगने १५ आणि कराबो मेसोने अवघ्या १० धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना तृषा गोंगाडीने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर परुनीका सिसोडीया, आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शुक्ला यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर शबनम शकीलने १ गडी बाद केला. या शानदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ८२ धावांवर संपुष्ठात आणला.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ८३ धावा करायच्या होत्या. भारतीय संघाची बॅटींग लाईनअप पाहता, हे आव्हान फार मोठं नव्हतं. भारतीय संघाला ३६ धावांवर पहिला धक्का बसला. कमलिनी ८ धावा करत तंबूत परतली. पण त्यानंतर तृषा गोंगाडी आणि सानिकाने भागीदारी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
भारतीय संघाकडून तृषाने नाबाद ४४ धावांची खेळी केली. तर सानिकाने नाबाद २६ धावांची खेळी केली. हा सामना भारतीय संघाने ९ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह २०२३ नंतर सलग दुसऱ्यांदा आयसीसी महिला अंडर १९ टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. या शानदार विजयानंतर भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकून इतिहासाला गवसणी घातली आहे.