बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी पोक्सो प्रकरणात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या अटकेला स्थगिती दिली. येडियुराप्पा यांच्या याचिकेवर सुनावणी करत कर्नाटक उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत अटकेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र न्यायालयाने येडियुराप्पा यांना 17 जून रोजी तपासात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सीआयडीच्या विशेष तपास पथकाने येडियुराप्पा यांना तपासात सहभागी होण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र ते बुधवारी तपासात सहभागी झाले नाही. येडियुराप्पा सध्या दिल्लीत असून त्यांनी तपासात सहभागी होण्यासाठी आणखी वेळ मागितल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर सीआयडीने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याची मागणी करत फर्स्ट फास्ट ट्रॅक कोर्टात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने वॉरंट जारी केले होते.
या वॉरंटविरोधात येडियुराप्पा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली न्यायालयाने त्यांच्या अटक वॉरंटला स्थगिती दिली.