बंगळूर : भाजपचे काम द्वेषाचे राजकारण करणे आहे, आम्ही कधीच सूडाचे राजकारण केले नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
म्हैसूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी काल-परवा राजकारणात आलो नाही. आजपर्यंत मी कोणावरही द्वेषाचे राजकारण केलेले नाही. ते भाजपचे काम असल्याचे ते म्हणाले.
देवेगौडा यांच्या कुटुंबानंतर येडियुरप्पा यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आल्याच्या केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या तक्रारीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, डी. के. शिवकुमार आणि राहुल गांधी यांच्यावरील खटल्याला काय म्हणायचे. राहुल यांचे खासदारकीचे पद रद्द करणे हे द्वेषाचे राजकारण होते की प्रेमाचे राजकारण होते, असा सवाल करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात पाठवणे हे द्वेषाचे राजकारण नव्हते का असा प्रश्न करून द्वेष आणि सूडाच्या राजकारण करणाऱ्या भाजपला त्यांनी फटकारले.
भाजप ईडी आणि सीबीआयचा वापर धमकावण्यासाठी करत आहे. यावेळी जनतेने त्यांना बहुमत दिले नसल्याचे ते म्हणाले.
नीटच्या पुनर्परीक्षेची मागणी
नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. याची चौकशी करून फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
कृपांक (ग्रेस मार्क्स) देऊन उत्तीर्ण होणे ही वाईट प्रथा आहे, नीट परीक्षा सुरळीत न घेता विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे त्याची फेरतपासणी व्हावी, असा आग्रह त्यांनी धरला.
दक्षिण भारतीय जनता भाजपला पाठिंबा देत नाही, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, दक्षिण भारतातील सात लोकांना केंद्रात मंत्री करूनही लोकांनी भाजपला साथ दिली नाही. भाजप हा आरएसएसचा मुखवटा आहे. त्यामुळे उत्तर भारतात भाजपचा पराभव झाला आहे. ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांच्या अहंकाराला जनतेने धडा शिकवला आहे.
जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुका लवकरच होणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले . म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की आम्ही जिल्हा आणि तालुका पंचायतीच्या निवडणुका लवकरात लवकर घेऊ .
दर्शनच्या प्रकरणावर प्रभाव टाकण्यासाठी कोणीही मला भेटलेला नाही. भाजप खोटे आरोप करत आहे. आम्ही या भूमीतील कायद्याचे पालन करू, कायदा सर्वांसाठी समान आहे.