Thursday , September 19 2024
Breaking News

‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस

Spread the love

 

बेंगळुरू : कर्नाटकातील माजी खासदार आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षातून बडतर्फ केलेला नेता प्रज्ज्वल रेवण्णाचे प्रकरण लोकसभा निवडणुकीदरम्यान बरेच गाजले. कर्नाटकमध्ये मतदान पार पडताच रेवण्णाचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर विदेशात पळून गेलेल्या रेवण्णाला काही दिवसांनी भारतात अटक झाली. आता या प्रकरणी विशेष तपास पथकाने तिसरे आरोपपत्र आमदार / खासदार विशेष न्यायालयात दाखल केले आहे. १,६९१ पानांच्या या आरोपपत्रात अनेक धक्कादायक आणि मन सुन्न करणाऱ्या बाबी पोलिसांनी नमूद केल्या आहेत.

आरोपपत्रात उल्लेख केल्यानुसार प्रज्ज्वल रेवण्णा पीडित महिलांना अत्याचारावेळी विशिष्ट कपडे परिधान करण्यासाठी बळजबरी करायचा. तसेच अत्याचार करत असताना बंदुकीचा धाक दाखवून हसण्यास भाग पाडायचा. २०२० ते २०२३ या काळात बंदुकीचा धाक दाखवून वारंवार अत्याचार केले असल्याचे एका पीडितेने जबाबात म्हटल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व घटनांचे प्रज्ज्वल रेवण्णाने चित्रीकरण केले असून जर पीडितेने बाहेर तोंड उघडल्यास सदर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली होती, असे पीडित महिलांनी सांगितले.

घरातच पीडितांवर अत्याचार
होलेनरासीपुरा येथील प्रज्ज्वल रेवण्णाच्या निवासस्थानी तिसऱ्या मजल्यावरील खोलीत अनेक महिलांवर अत्याचार झाल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. यासोबत काही घटनांचा व्हिडीओही जोडला गेला आहे.

प्रज्ज्वल पीडितांना कसे हेरायचा? याबाबत एका आमदाराने साक्ष दिली आहे. संबंधित आमदार आणि तत्कालीन खासदार प्रज्ज्वल एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले असताना तेथील एका महिलेशी त्याने ओळख केली. तसेच तिच्या संपर्कात राहून तिला स्वतःच्या निवासस्थानी येण्यास भाग पाडले. जिथे आल्यानंतर तो महिलांवर अत्याचार करायचा.

प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले होते. या पथकाने १२० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. तसेच पीडितांच्याही तक्रारी घेऊन महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत. याआधारावर प्रज्ज्वलवर कलम ३७६ (२) (न) नुसार वारंवार बलात्कार करणे, कलम ५०६, कलम ३५४ अ, ब आणि क नुसार विविध गुन्हे दाखल केले आहेत. १९ सप्टेंबर रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात प्रज्ज्वल रेवण्णाच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

मुडा प्रकरण : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या याचिकेवर आज पुढील सुनावणी

Spread the love  अंतिम निकालाचीही शक्यता बंगळूर : राज्याच्या राजकारणात उत्सुकता निर्माण करणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *