Friday , December 12 2025
Breaking News

योगेश्वर यांचा भाजपला रामराम, काँग्रेस पक्षात प्रवेश

Spread the love

 

चन्नपट्टणमधून उमेदवारी शक्य; धजदच्या उमेदवारीची भाजपची ऑफर फेटाळली

बंगळूर : एका नाट्यमय घडामोडीमध्ये, भाजप नेते आणि माजी मंत्री सी. पी. योगेश्वर यांनी बुधवारी भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांना १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत चन्नापट्टणमधून कॉंग्रेसची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांना धजदच्या तिकीटावर निवडणुक लढविण्याची दिलेली ऑफर त्यांनी फेटाळून लावली.
योगेश्वर यांनी सोमवारी आमदारकीचा राजीनामा दिला होता, त्यांनी आदल्या दिवशी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली, जे प्रदेश काँग्रेसचे प्रमुख देखील आहेत.
रामलिंगा रेड्डी, कृष्णा बैरेगौडा, चेलुवरायस्वामी आणि जमीर अहमद खान यांच्यासह अन्य पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत शिवकुमार यांनी योगेश्वर यांच्या काँग्रेस प्रवेशाचे प्रदेश मुख्यालयात स्वागत केले.
राज्यातील सांडूर आणि शिग्गाव विधानसभा क्षेत्रांसह चन्नपट्टण विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे, जिथे उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर आहे.
धजदचे प्रदेशाध्यक्ष आणि आता केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी – मंड्यातून लोकसभेसाठी निवडून आल्याने ही जागा रिक्त झाल्याने चन्नपट्टण पोटनिवडणूक आवश्यक आहे.
भाजपने चन्नपट्टण जागा त्यांच्या एनडीए भागीदार धजदला दिल्याने, अभिनेता-राजकारणी बनलेल्या योगेश्वर यांनी आघाडीच्या नेत्यांना भगवा पक्षाकडून तिकीट देण्याचा विचार करण्याचे आवाहन केले होते. तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
योगेश्वरांना धजदच्या तिकिटावर उभे करण्याची योजना होती, परंतु त्यांना त्यात रस नव्हता, असे सूत्रांनी सांगितले.
“त्याऐवजी, त्यांना कुमारस्वामींनी भाजप उमेदवार म्हणून पाठिंबा द्यावा अशी त्यांची इच्छा होती, जी त्यांना आणि त्यांच्या पक्षाला मान्य नव्हती,” असे धजदच्या सूत्रांनी सांगितले.
शिवकुमार यांचे बंधू आणि माजी खासदार डी. के. सुरेश यांना चन्नपट्टणचे तिकीट देण्याची काँग्रेसच्या एका गटाकडून मागणी होती, परंतु त्यांनी योगेश्वराची “लोकप्रियता, प्रभाव आणि जिंकण्याची क्षमता” लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते, ज्यामध्ये त्यांनी भुतकाळात प्रतिनिधित्व केले होते.
“डीके ब्रदर्स” – शिवकुमार आणि सुरेश – वक्कलिग प्राबल्य असलेल्या प्रदेशात काँग्रेसची गमावलेली जागा पुन्हा मिळवण्याची आशा करत आहेत, जो त्यांचा गृह मतदारसंघ आहे.
धजदच्या सूत्रांनुसार, कुमारस्वामी यांना आपण प्रतिनिधित्व केलेली चन्नापट्टणची जागा योगेश्वर किंवा भाजपला सोडायची नव्हती. कुमारस्वामी यांनी २०१८ आणि २०२३ मध्ये चन्नापट्टण मतदारसंघातून विजय मिळवला होता.
त्याआधी योगेश्वर यांनी भाजप आणि समाजवादी पक्षाकडून या जागेचे प्रतिनिधित्व केले होते. यापूर्वीही त्यांनी अपक्ष आणि काँग्रेसकडून या जागेचे प्रतिनिधित्व केले होते.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *