बेळगाव : भाजपची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील -यत्नाळ यांची पक्षातून 6 वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने तसा आदेश जारी केला आहे. सातत्याने वादग्रस्त विधाने करून बसनगौडा यांनी पक्षश्रेष्ठींचा रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. पक्षाच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने 10 फेब्रुवारी 2025 रोजीच्या कारणे दाखवा नोटीसीवरील तुमच्या उत्तराचा विचार केला आहे.
तथापी पूर्वीच्या कारणे दाखवा सूचनेला प्रतिसाद म्हणून चांगले वर्तन आणि वर्तणूक करण्याचे आश्वासन देऊनही तुम्ही वारंवार पक्ष शिस्तीचे उल्लंघन केले असून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार तुम्हाला पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून तात्काळ 6 वर्षांसाठी काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे या पत्रात म्हटले आहे.