
७५ ठिकाणी शोध मोहीम, अनधिकृत मिळकत, कागदपत्रे ताब्यात
बंगळूर : लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (एसीबी) ने बुधवारी राज्यातील सर्वात मोठी कारवाई सुरू केली आणि कथित बेहिशोबी मालमत्ता (डीए) प्रकरणी १८ अधिकाऱ्यांवर छापे टाकले. अतिरिक्त महासंचालक, एसीबी, सीमांत सिंग यांच्या म्हणण्यानुसार, एसीबीच्या १०० अधिकाऱ्यांचे पथक ३०० कर्मचाऱ्यांसह ७५ ठिकाणी शोध घेत आहेत.
एसीबी जिल्हा एसपी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो अधिकाऱ्यांच्या पथकाने एकाच वेळे अधिकाऱ्यांच्या मिळकतीचा शोध सुरू केला. बंगळूर, बेळगाव, बदामी, रायचूर, दावणगेरे, विजापूर, हावेरी आणि चामराजनगरसह विविध जिल्ह्यांतील ७५ ठिकाणी छापे घालण्यात आले.
ज्ञानेंद्रकुमार, अतिरिक्त आयुक्त, वाहतूक आणि रस्ता सुरक्षा, बेंगळुरू, राकेश कुमार, नगर नियोजन, बंगळूर विकास प्राधिकरण (बीडीए), रमेश कानकट्टे, प्रादेशिक वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, यादगीर, बसवराज शेखर रेड्डी पाटील, कार्यकारी अभियंता, कौजलगी विभाग, गोकाक, बसवकुमार एस एनीगेरी, शेरस्तेदार, डीसी ऑफिस, गदग, गोपीनाथ एन मालगी, प्रकल्प व्यवस्थापक, निर्मिती केंद्र, विजापूर, बी. के. शिवकुमार, अतिरिक्त संचालक, उद्योग आणि वाणिज्य, बंगळुर, शिवानंद पी शरणप्पा खेडगी, आरएफओ, बदामी, मंजुनाथ, सहाय्यक आयुक्त, रामनगर, श्रीनिवास, महाव्यवस्थापक, समाज कल्याण विभाग, महेश्वरप्पा, जिल्हा पर्यावरण अधिकारी, दावणगेरे, कृष्णन, कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), हावेरी, चालुवराज, निरीक्षक, उत्पादन शुल्क, गुंडलुपेटे तालुका, गिरीश, सहाय्यक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, बालकृष्ण एच. एन., निरीक्षक, विजयनगर पोलीस स्टेशन, म्हैसूर, गविरंगप्पा, सहाय्यक कार्यकारी अभियंता (एईई), सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लूडी), चिक्कमंगळूर, अशोक रेड्डी पाटील, एईई, कृष्ण भाग्य जल निगम लिमिटेड, देवदुर्ग, रायचूर आणि दया सुंदर राजू, एईई, कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन (केपीटीसीएल), दक्षिण कन्नड या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर व कार्यालयावर छापे घालून एसीबी अधिकाऱ्यांनी शोध कार्य हाती घेतले आहे.
छापे घालण्यात आलेल्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी त्याच्या अधिकृत मिळकतीपेक्षा कित्तेकपटीने संपती मिळविल्याचे आढळून आले आहे. त्याच्या निवास्स्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या वस्तू, भूखंड, अलिशान बंगले, मौल्यवान वस्तू, वाहने खरेदी केल्याचे आढळून आले आहे. कांही अधिकाऱ्यांकडे मोठ्याप्रमाणात ठेव ठेवण्यात आलेली प्रमाणपत्रे सापडली आहे. एसीबी अधिकाऱ्यांनी महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन शोधकार्य सुरू केले आहे. रात्री उशीरापर्यंत शोध घेण्यात येत होता.
कचरापेटीत पैसे, सोने
एसीबीच्या छाप्यात रायचूर येथील सहाय्यक कार्यकारी अभियंता (एईई) अशोक रेड्डी पाटील यांच्या घरातील कचरा पेटीत सात लाख रुपये रोख रक्कम, ६०० ग्रॅम चांदी, ४१८ ग्रॅम सोन्याचे दागिने आढळून आले आहेत. त्यांच्या घराचा कसून शोध घेण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta