कारवार : कारवारचे उद्योजक आणि भाजप नेते आर. एन. नायक यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात अंडरवल्ड डॉन बनंजे राजा याच्यासह एकूण 16 आरोपींपैकी 9 जणांना बेळगावच्या कोका न्यायालयाने आज दोषी ठरवून महत्वाचा निकाल दिला.होय, 21 डिसेंबर 2013 रोजी आर. एन. नायक यांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. 3 कोटी रुपयांची सुपारी देऊन ही हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले होते. या हत्येत बनंजे राजा या अंडरवल्ड डॉनचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्यासह १६ आरोपींवर कर्नाटक ऑर्गनाईझ्ड क्राईम कंट्रोल ऍक्ट (कोका) अन्वये अंकोला पोलिसांनी गुन्हा दाखल करून कोका न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी बनंजे राजाला 12फेब्रुवारी 2015 रोजी मोरक्को येथे बेड्या ठोकल्या होत्या. नकली पासपोर्ट बाळगल्यावरून अटक करून, कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून 14फेब्रुवारी 2015 रोजी त्याला भारतात आणण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यासह १६ आरोपींवर बेळगाव येथील कोका न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. 7 वर्षे प्रदीर्घ सुनावणी केल्यावर कोका न्यायालयाचे न्या.चंद्रशेखर जोशी आज, बुधवारी या प्रकरणी महत्वाचा निकाल दिला. यात अंडरवल्ड डॉन बनंजे राजासह ९ आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे. बनंजे राजासह ९ आरोपींवर लावलेले सर्व आरोप सिद्ध झाले आहेत. या खटल्यातील आरोपी क्र. 6, 11 आणि 16 यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. आरोपी क्र. 6, केरळचा रब्बीन पिच्चे, आरोपी क्र. 11 बंगळूरचा महंमद शाबन्दरी आणि आरोपी क्र. 16 उत्तर कन्नड जिल्ह्यातील आनंद नायक अशी निर्दोष मुक्त झालेल्यांची नावे आहेत. उर्वरित सर्व ९ आरोपींवरील आरोप सिद्ध झाले आहेत. त्यात उत्तर प्रदेशचा जगदीश पटेल, बंगळूरचा अभि बंडगार, उडुपीचा गणेश बजंत्री, केरळचा के. एम. इस्माईल, हासनचा महेश अच्चंगी, केरळचा संतोष ए. बी., आरोपी क्र. ९ उडुपीचा बनंजे राजा, आरोपी क्र. १० बंगळूरचा जगदीश चंद्रराज, ११वा उत्तर प्रदेशचा अंकितकुमार यांना न्या.चंद्रशेखर जोशी यांनी दोषी ठरविले. त्यांना ४ एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार असल्याने न्या. जोशी यांनी जाहीर केले. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील ऍड. के. जी. पुराणिकमठ, अतिरिक्त वकील शिवप्रसाद अल्वा यांनी युक्तिवाद केला. बनंजे राजातर्फे ऍड. एम. शांताराम यांनी युक्तिवाद केला. या खटल्याबाबत सरकारतर्फे युक्तिवाद केलेले ऍड. के. जी. पुराणिकमठ आणि ऍड. प्रवीण करोशी यांनी प्रसारमाध्यमं माहिती दिली. या खटल्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रताप रेड्डी, अलोककुमार, माजी पोलीस अधिकारी भास्कर राव, अण्णा मलाई यांच्यासह एकूण 210 साक्षीदार तपासण्यात आले. तर एकूण 1027 कागदोपत्री पुरावे 138 मुद्देमाल तपासण्यात आले. आता येत्या ४ एप्रिलला आरोपींना न्यायालय कोणती शिक्षा सुनावणार याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.
