
बेळगाव : शेतकर्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळावा, शेतकर्यांच्या विविध समस्या सोडवाव्या या मागण्यांसाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या शिग्गावी येथील कार्यालयाला शेतकर्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. राज्यातील शेतकर्यांसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. शेतकर्यांनी पिकविलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. शेतकर्यांची वीज समस्या सुटत नाही. परंतु यासंदर्भात शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही किंवा कोणती उपाययोजनाही करण्यात येत नाही. यासाठी सर्व शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली आज शिग्गावी येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला घेराव घालण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकर्यांना हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी 30 हून अधिक शेतकरी नेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी आपल्याला आपले हक्क मिळावेत यासाठी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकरी नेते चोन्नप्पा पुजारी म्हणाले, सरकारने बाजरी, मका यासह अनेक पिकांसाठी आधारभूत किंमत जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. या धान्यांसाठी खरेदी केंद्रे उघडावी, पिकाला योग्य भाव मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच शेतकर्यांसमोर वीज समस्या देखील उभी आहे. शेतकर्यांच्या अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाला घेराव घालण्यासाठी आपण आंदोलन छेडले असता आम्हाला पोलिसांनी अटक केल्याचे पुजारी म्हणाले. शिवाय आमचा संघर्ष कोणत्याही कारणास्तव थांबणार नसल्याचेही ते म्हणाले.
या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांचे नेते पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta