चारजण जखमी, जाळपोळीच्या घटना, १८ जणाना अटक
बंगळूर : बागलकोट जिल्हा पोलिसांनी केरूर येथे झालेल्या दोन गटातील हाणामारीच्या प्रकरणी नऊ जणांना अटक केली आहे, असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी गुरूवारी (ता. ७) सांगितले. पोलिस सूत्रांनी सांगितले की, या घटनेच्या संदर्भात केरूर आणि आसपासच्या भागातील १८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आणखी पंधरा जणांचा पोलिस शोध घेत आहेत.
यापूर्वी ६ जुलै रोजी रात्री केरूर येथील बसस्थानकाजवळ झालेल्या गटबाजीतून तिघा जणांवर हल्ला झाला, त्यात चार जण जखमी झाले. त्यानंतर संतत्प जमावाने काही गाड्या आणि वाहने जाळली. अरुण कट्टीमणी, लक्ष्मण कट्टीमणी व चुंगी यमनूर शहरातील बसस्थानकाकडे चालत जात होते. मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अरुणच्या पाठीत चाकूने वार केले, तसेच त्याच्या डोकीवर लोखंडी रॉडने वार करण्यात आले. अरुणच्या दोघा मित्रांनाही हल्लेखोरानी भोसकले. यावेळी झालेल्या झटापटीत बंदे नवाज गोकाक यांच्या डोक्याला दुखापत झाली. चौघांनाही स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
संतप्त जमावाने किमान १० गाड्या आणि पाच वाहने जाळली. भाजी मंडईतील एका दुकानाची जाळपोळही केली. बदामीचे तहसीलदार जे. बी. मज्जीगी यांनी बुधवार (ता. ६) रात्री ते ८ जुलै (शुक्रवार) रात्रीपर्यंत कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. दोन दिवस (७ व ८) शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय राखीव बटालियनच्या (आरआयबी) पाच प्लाटून तैनात करण्यात आल्या आहेत.
पोलिस अधीक्षक एस. जयप्रकाश आणि उपायुक्त पी. सुनील कुमार यांनी केरूरला भेट दिली.
दंगलीचे कारण
तहसीलदारांच्या म्हणण्यानुसार, अरुण कट्टीमणी आणि यासीन पेंढारी यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर जातीय हिंसाचारात झाले. एका महिलेची छेडछाड हे कारण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, तर काही जणांनी एका महिला डॉक्टरच्या सोशल मीडिया पोस्टवरून भांडण झाल्याचे समजते.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याला विरोध करणारा मेसेज डॉक्टरांनी पोस्ट केला आणि तिच्यावरील निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामुळे डॉक्टरांच्या अटकेसाठी पोलिसांकडे गेलेल्या उजव्या विचारसरणीचे सदस्य संतप्त झाले. स्थानिक पोलिसांनी त्यांना सहकार्य केले नाही आणि एफआयआर नोंदवण्यास नकार दिला.
अरुण कट्टीमणी हा डॉक्टरांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गटाचा एक भाग होता. अन्य एका गटाने कथितपणे अरुणला हा मुद्दा पोलिसांकडे नेल्याबद्दल चौकशी केली. त्यामुळे हाणामारी झाली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
माझा मुलगा अरुण हा एका हिंदुत्ववादी संघटनेचा जिल्हा सचिव आहे. तो अनेकदा पोलीस स्टेशन आणि इतर कार्यालयात जाऊन वाद मिटवत असे. परंतु त्याच्यावर गुन्ह्याचा खोटा आरोप लावला जात होता, अशा तरुण मुलांचे संरक्षण करायचे, असे रामण्णा कट्टीमनी यांनी सांगितले. ते आपल्या जखमी मुलाला पहाण्यासाठी रुग्णालयात आले होते. ते म्हणाले, की त्यांनी माझ्या मुलाला लक्ष्य केले, कारण त्यांना केरूरमधील हिंदुत्ववादी शक्तींचा उदय थांबवायचा आहे.
उद्या केरूर, ९ रोजी बागलकोट बंद
केरूरमध्ये दोन कार्यकर्त्यांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू जागरण वेदिकेने उद्या (ता. ८) केरूर आणि शनिवारी (ता. ९) बागलकोटमध्ये बंदची हाक दिली आहे.
हिंदू जागरण वेदिकेचे नेते पी. कुमारस्वामी यांनी आरोपींविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे, ती अयशस्वी झाल्यास संघटनेने थेट कारवाई करण्याची धमकी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta