हुबळी : राज्यातील भाजप सरकार लूट करण्यात व्यस्त आहे, हे भाजपनेच सिद्ध केले आहे. हि बाब लक्षात घेऊन काँग्रेसला सर्वसामान्य जनतेचा वाढता पाठिंबा आहे. या पाठिंब्यामुळेच आगामी निवडणुकीत काँग्रेस बहुमताने सत्तेवर येईल, असा विश्वास काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारला प्रशासकीय अपयश आले आहे. राज्यातील नेत्यांना भाजप विरोधात जनतेला माहिती देण्यासाठी बोलाविण्यात आली असून यादरम्यान 40 टक्के कमिशन, भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई, आणि इतर मुद्द्यांवर जनतेलाही माहिती झाली असल्याचे ते म्हणाले.
भाजप सरकारवर राज्यातील जनता नाराजी व्यक्त करत आहे. काँग्रेसमध्ये एकजूट करून आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी करण्यात येत असल्याची माहितीही वेणुगोपाल यांनी दिली. राज्यातील काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत कोणताही संभ्रम नसून वैयक्तिक मतांना पक्षात थारा नाही. निवडणुकीसंदर्भात निर्णय हायकमांड घेईल आणि त्यानुसार सर्व नेते एकजूटपणे काम करतील. काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत मतभेदाबद्दल बाहेर चर्चा होत आहे, या केवळ अफवा असून काँग्रेस देशात आणि राज्यात एकदिलाने लढेल आणि कर्नाटकात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी ताकद दाखवेल, असा विश्वास के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केला.