शिवमोगा : कर्नाटकातील शिवमोगा येथे सोमवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यास एका गटाने आक्षेप घेतला. त्या ठिकाणी टीपू सुल्तान यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्याचा प्रयत्न या गटाने केला. त्यावरून दोन गटांत संघर्ष झाल्यानंतर काही तासांनी गांधीबाजार भागात एकास तीक्ष्ण शस्त्राने भोसकण्यात आले.
या प्रकारानंतर शिवमोगा शहरात तणाव निर्माण झाल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव प्रेमसिंह असे असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील अमीर अहमद नाक्यावरील वीजखांबावर वीर सावरकर यांचा फलक लावण्याचा प्रयत्न एका गटाने केला होता. दोन्ही गटांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. तेथे अतिरिक्त बंदोबस्त ठेवला आहे. तेथील बाजारपेठ त्यानंतर बंद झाली.
शिवमोगाचे जिल्हाधिकारी आर. सेल्वमणी यांनी शिवमोगा शहर तसेच भद्रावती शहरातील शाळा-महाविद्यालये आज मंगळवार दि. १६ रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही ठिकाणी १८ तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. येथील स्थिती नियंत्रणात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta