दावणगिरी : होन्नाळीचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव रेणुकाचार्य यांच्या बेपत्ता झालेल्या पुतण्याचा मृतदेह तुंगभद्रेच्या कालव्यात बंद कारगाडीत आढळला आहे.
रेणुकाचार्य यांचे भाऊ एम. पी. रमेश यांचा मुलगा चंद्रशेखर हा चार-पाच दिवसांपासून बेपत्ता होता. यासंदर्भात होन्नाळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
दोन दिवसांपूर्वी चंद्रशेखर हा शिमोगा येथील गौरीगड्डे येथे राहणाऱ्या विनय गुरुजींना भेटून येतो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. विनय गुरुजींची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर तो शिमोगा शहरात परतला. तेथे काही वेळ आपल्या मित्रांसोबत घालवल्यानंतर होन्नाळीला जातो, असे सांगून त्याने मित्रांचा निरोप घेतला. पण, तो होन्नाळीला आपल्या घरी परतलाच नाही.
घरातून बाहेर गेलेला चंद्रशेखर घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत होते. अशातच त्यांचा फोनही स्विच ऑफ दाखवत असल्याने त्यांची चिंता वाढली होती. होन्नाळी पोलिसांत याबद्दल तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते.
आज चंद्रशेखर याची क्रेटा कार सोरटूरजवळील तुंगभद्रा नदीच्या वरच्या कालव्यात सापडली. होन्नाळी आणि न्यामती मार्गादरम्यानच्या कालव्यातून कार बाहेर काढण्यात आली असून कारमध्ये चंद्रशेखरचा काही अंशी सडलेला मृतदेह आढळला आहे. कार सापडल्याची माहिती मिळताच रेणुकाचार्य आणि त्यांचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले.
कार कालव्यात पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या माहितीच्या आधारे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन क्रेनच्या सहाय्याने गाडी वर काढली.
यावेळी गाडीत मागच्या बाजूला मृतदेह आढळून आला. गाडीचे नियंत्रण सुटून कार कालव्यात पडली, की अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta