स्वागताची जय्यत तयारी, केंपेगौडांच्या पुतळ्याचे अनावरण
बंगळूर : बंगळूरचे संस्थापक केंपेगौडा यांच्या १०८ फूट उंच पुतळ्याच्या अनावरणासह विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी बंगळुरमध्ये दाखल होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी उद्याननगरी सज्ज झाली आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेतही काही बदल करण्यात आले असून शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्तात वाढ करण्याात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता.११) राजधानी बंगळुरमध्ये दाखल होत आहेत. यानिमित्त त्यांचे तीन अधिकृत कार्यक्रम ठरलेले आहेत. उद्या कनकदास जयंतीनिमित्त विधानसौध येथे कवी-संत कनकदासांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करतील. क्रांतिवीर सांगोळी रायण्णा स्थानकावर दक्षिण भारतात प्रथमच धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला ग्रीन सिग्नल, केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल २ चे उद्घाटन आणि बंगळुरचे संस्थापक केंपेगौडा यांच्या पुतळ्याचे अनावरण या प्रमुख कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदी सकाळी १० वाजता एचएएल विमानतळावर पोहोचतील आणि त्यानंतर रस्त्याने विधानसौधाकडे रवाना होतील. सकाळी १०-३० वाजता जगद्गुरू निरंजनानंद पुरी महास्वामीजींच्या उपस्थितीत कनकदास आणि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील.
रात्री १०-४० च्या सुमारास मोदी आपल्या ताफ्याच्या वाहनातून क्रांतिवीर संगोळी रायण्णा रेल्वे स्थानकाकडे रवाना होतील. वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ११ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून चेन्नईकडे रवाना होणाऱ्या ट्रेनला पंतप्रधान हिरवी निशाणी दाखवतील. प्लॅटफॉर्म ८ वरून जाणाऱ्या भारत गौरव काशी दर्शन रेल्वेला ते चालना देतील.
त्यानंतर सकाळी ११-१० च्या सुमारास ते रस्त्याने हेब्बाळ येथील एअर फोर्स ट्रेनिंग कमांड सेंटर येथे जातील. तेथे निरीक्षण केल्यानंतर ते हेलिकॉप्टरने केम्पेगौडा विमानतळावर जातील आणि दुपारी १२.१० च्या सुमारास केम्पेगौडा यांच्या १०८ फूट ब्राँझ पुतळ्याचे लोकार्पण करतील.
दुपारी एक वाजता विमानतळाजवळ कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे भाषण होणार आहे. दुपारी १.१० वाजता मोदी अटल मिशन फॉर रिजुव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत योजना) २.० प्रकल्पाचे उद्घाटन करतील, दुपारी १.३५ वाजता मोदी जाहीर सभेत भाषण करतील.
वाहतूक निर्बंध
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान बंगळुरमध्ये सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सीटीओ जंक्शन, पोलीस थिम्मया जंक्शन, राजभवन रोड, बसवेश्वर सर्कल, पॅलेस रोड, रेसकोर्स रोड, सांके रोड, क्वीन्स रोड, बेळ्ळारी रोड, एअरपोर्ट एलिव्हेटेड कॉरिडॉर, महाराणी ब्रिज, शेषाद्री रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावरून वाहनांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.
मॅजेस्टिक शांताळा जंक्शन ते म्हैसूर बँक सर्कल ते केजी रोड, खोडे अंडरपास ते वाटाळ नागराज टॉड ते पीएफ ऑफिस आणि केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजूबाजूच्या भागात वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta