Sunday , December 22 2024
Breaking News

कर्नाटकात झिका व्हायरसची एन्ट्री; पाच वर्षांच्या मुलीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

Spread the love

 

बेंगळुरू : तब्बल दोन वर्षाच्या प्रादुर्भावानंतर देशातील कोरोनाचा आलेख हळूहळू शून्याकडे वाटचाल करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोरोनाची डोकेदुखी संपली असली तरी, आता नव्या आजारानं प्रशासनाची चिंता वाढवली आहे. देशात आता झिका व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. पुण्यानंतर आता कर्नाटकात झिका व्हायरसची लागण झाल्याच्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यात एका व्यक्तिला झिका व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं.

कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. कर्नाटकातील रायचूर  जिल्ह्यातील पाच वर्षांच्या मुलीला झिकाची लागण झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, झिका व्हायरसची लागण झाल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. मात्र, रुग्णाची प्रकृती स्थिर असून चिंतेचं कारण नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. यासोबतच सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून लवकरच याबाबत गाईडलाईन्स जारी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

5 डिसेंबरला तीन नमुने पाठवण्यात आले

कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुण्याच्या लॅबमधून आम्हाला मिळालेल्या अहवालात पाच वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. 5 डिसेंबर रोजी कर्नाटकमधून रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यासोबतच आणखी 2 नमुने पाठवण्यात आले आहेत. इतर दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ज्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, ती पाच वर्षांची मुलगी आहे. सध्या आरोग्य विभाग या मुलीच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. काही महिन्यांपूर्वी केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये झिका व्हायरसचे रुग्ण आढळले होते.”

राज्य सरकार अलर्टमोडवर

कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, “सरकार खबरदारी घेत असून रायचूर आणि शेजारील जिल्ह्यांतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही रुग्णालयात संशयित संसर्गाची प्रकरणं आढळल्यास झिका विषाणू चाचणीसाठी नमुने पाठविण्यास सांगितलं आहे. सध्या ज्या मुलीमध्ये या विषाणूची पुष्टी झाली आहे, तिनं देशाबाहेर प्रवास केलेला नाही. आतापर्यंत या विषाणूची ही एकच केस आहे. असं असूनही प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.”

About Belgaum Varta

Check Also

अभियंता अतुलकडून निकीता मागत होती 80 हजार रुपये मेंटेनन्स

Spread the love  बेंगळुरू : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *