विद्यमान आमदारांना उमेदवारी निश्चित, निवडणूक समितीची दोन फेब्रुवारीला बैठक
बंगळूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या १०० हून अधिक मतदारसंघांसाठी उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यादी अंतिम करण्यासाठी काँग्रेसच्या राज्य निवडणूक समितीची दोन फेब्रुवारीला बैठक होणार असून उमेदवारांची पहिली यादी १० फेब्रुवारीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्व विद्यमान आमदारांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीबाबत २-३ सर्वेक्षणे यापूर्वीच झाली असून, या सर्वेक्षण अहवालाच्या आधारे आणि निवडणुकीसाठी यापूर्वी तिकिटासाठी अर्ज केलेल्यांची पार्श्वभूमी आणि विजयाचे निकष विचारात घेऊन यादी अंतिम केली जाईल. दोन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्य निवडणूक समितीच्या बैठकीत सर्वसमावेशक चर्चा होणार आहे.
काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, चुरस असलेल्या मतदारसंघातील दोन नावे अंतिम करून राज्य निवडणूक समिती पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवेल. राज्य निवडणूक समितीने पाठवलेल्या यादीनंतर काँग्रेस नेते आपापल्या सूत्रांकडून उमेदवारांच्या निवडीची माहिती गोळा करून अखेर उमेदवारांची यादी जाहीर करतील.
काँग्रेस पक्षाने १०० हून अधिक जागांवर विजयी होणाऱ्या उमेदवारांची ओळख पटवली असून पहिल्या यादीत १०० उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत विद्यमान आमदारांचा समावेश रहाणार आहे.
भाजप पक्षाच्या उमेदवारांची नावे निश्चित होण्यापूर्वी काँग्रेसची यादी जाहीर करण्याचा निर्णय काँग्रेस नेत्यांनी घेतला असून, उमेदवारांची नावे लवकरात लवकर निश्चित करून निवडणुकीसाठी अधिक वेळ देण्याचा काँग्रेस नेत्यांचा विचार आहे. यापूर्वी दीड महिन्यावर निवडणूक असताना उमेदवारांची निवड जाहीर करण्यात आली होती. प्रचारासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाल्याची उदाहरणे लक्षात घेऊन यावेळी काँग्रेसने विजयाची शक्यता असलेल्या मतदारसंघात लवकरात लवकर उमेदवारांची नावे जाहीर करण्याची रणनीती आखली आहे.
काँग्रेसच्या ‘प्रजाध्वनी बस’ यात्रेपूर्वी १०० मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्याचा निर्णय झाला असला तरी बस यात्रेदरम्यान होणारा संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी बस यात्रेनंतर उमेदवारांची नावे निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या महिन्याच्या अखेरीस बसचा दौरा संपणार असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांची निवड अंतिम करण्याचा प्रयत्न होणार आहे.
दोन फेब्रुवारी रोजी बंगळुर येथील काँग्रेस कार्यालयात केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक समितीची बैठक नियोजित करण्यात आली आहे. त्यात विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह सर्व महत्त्वाचे नेते सहभागी होऊन उमेदवारांची पहिली यादी तयार करतील, असे कॉंग्रेसच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta