केंद्रीय पथक बंगळुरात दाखल; अधिकारी व राजकीय पक्षांशी चर्चा
बंगळूर : राज्यात निवडणुकीचा ज्वर हळूहळू वाढत असतानाच, निवडणूक आयोगही स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी सर्व प्रकारची तयारी करत आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांचे आज तीन दिवसांसाठी राज्यात आगमन झाले. विधानसभा निवडणुकीच्या प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी राजकीय पक्षांसह अधिकाऱ्यांच्या साखळी बैठका घेतल्या.
राज्यात निवडणुका कधी घ्याव्यात, निवडणुकीसाठी कोणती तारीख योग्य आहे, निष्पक्ष आणि मुक्त निवडणुकांसाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी या बैठकांमध्ये चर्चा केली.
दिल्लीहून मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ आज दुपारी बंगळूर येथे दाखल झाले. निवडणूक आयुक्त अनूप चंद्रपांडे, अरुण गोयल आणि उपायुक्त, आयोगाचे वरिष्ठ अधिकारी या शिष्टमंडळात आहेत.
दिल्लीहून बंगळुरूला आल्यानंतर लगेचच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी विकाससौध येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत निवडणूकपूर्व बैठक घेतली.
या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्तांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तसेच निवडणुका कधी घ्याव्यात याबाबत अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.
मुक्त व निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत, याबाबतही मुख्य निवडणूक आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सल्ला व सूचना दिल्या.
या बैठकीला मुख्य सचिव वंदिता शर्मा, पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राजकीय पक्षांशी चर्चा
या बैठकीनंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भात त्यांचा सल्ला व मते जाणून घेतली.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखालील पथकाने राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेतली. केंद्रीय निवडणूक आयुक्तांचे पथक आज, उद्या आणि परवा असे तीन दिवस राज्यात राहणार असून, उद्या ते निवडणुकीच्या तयारीसंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणार आहेत. शनिवारी ते मतदार जागृतीसह विविध कार्यक्रमांतून भाग घेतील. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेऊन पथक दिल्लीला परतणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta