बेळगाव : पाचवी व आठवीच्या बोर्ड परीक्षेला सोमवार (ता. २७) पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. प्रशिक्षण खात्यानेही परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. क्लस्टरनिहाय पेपर तपासणीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पेपर झाल्यानंतर शाळांना क्लस्टरवर उत्तरपत्रिका वेळेत द्याव्या लागणार आहेत.
शिक्षण खात्याने पाचवी व आठवीची पब्लिक परीक्षा बोर्डाकडून घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये परीक्षा केंद्र असेल, अशी माहिती शिक्षण खात्याने दिली आहे. २७ ते ३१ मार्चपर्यंत ही परीक्षा होणार असून दहावी परीक्षेच्या धर्तीवर
बोर्ड परीक्षा घेतली जाणार आहे. सुरुवातीला बोर्ड परीक्षा घेण्यास अनेक शाळांनी विरोध दर्शविला होता. मात्र, शिक्षण खात्याने बोर्ड परीक्षा देणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, या परीक्षेसाठी शाळा परीक्षा आणि मूल्यमापन मंडळातर्फे प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण खात्याने सुरुवातीला जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांची मौखिक परीक्षा घेण्यात आली आहे. तर सोमवार (ता. २७) पासून लेखी परीक्षा होणार आहे. मात्र, याचकाळात बारावी व दहावी परीक्षा आहे.
ज्या शाळांमध्ये बारावीच्या परीक्षेचे केंद्र आहे, त्या ठिकाणी दुपारच्या सत्रात पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. परीक्षा काळात कॉपीला थारा देऊ नये, अशी सूचनाही शिक्षण खात्यातर्फे करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta