विजयपूर : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागेपैकी काँग्रेस पक्षाच्या वतीने 124 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये 32 लिंगायत नेत्यांना उमेदवारी देऊन लिंगायत समाजास प्राधान्य दिले आहे.
राज्यातील भाजपा सरकारने पंचमसाली लिंगायत समाजाच्या 2 ए मध्ये समावेश न करता 2 डि असे वेगळे कॅटेगरी निर्माण करुन आरक्षण जरी दिले असले तरी पंचमसाली लिंगायत समाज नाराज आहे, त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राज्यातील प्रमुख समाज लिंगायत समाजाची मते काँग्रेसकडे वळविण्यासाठी 32 लिंगायतांना उमेदवारी देण्यात आली आहे. उरलेल्या 100 जागेपैकी अजून काही लिंगायत समाजाच्या नेत्यांना उमेदवारी देण्यात येईल यात कोणतीच शंका नाही. त्याच बरोबर दक्षिण कर्नाटकात प्राबल्य असलेल्या वक्कंलिग समाजास 19 जागेवर उमेदवारी देण्यात आली आहे. तर आठ अल्पसंख्याक मुस्लिम, ब्राह्मण, रेड्डी, करुब, समाजाचे प्रत्येकी पाच जणांना, ईडग समाज चार, मराठा समाजाला दोन, ख्रिस्त, वंटी, रजपूत व उप्पार समाजाच्या प्रत्येकी एक नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राज्यातील एकूण 36 राखीव मतदारसंघातून 22 जणांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
वडील व मुला-मुलींना उमेदवारी
रामलिंग रेड्डी त्यांची मुलगी सौम्या रेड्डी, मुनियप्पा यांची मुलगी रुपकला, एम कृष्णप्पा यांच्या मुलगा प्रियकृष्णा, तर श्यामनूर शिवशंकरप्पा यांचा सुपुत्र एस. एस. मल्लिकार्जुन असे एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे हे विशेष.
दावनगिरी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरले 91 वर्षीय श्यामनूर शिवशंकरप्पा हे सर्वात वयोवृद्ध उमेदवार आहेत.
काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत सहा विद्यमान आमदारांना उमेदवारी घोषित करण्यात आली नाही, त्यामुळे त्या मतदारसंघातून नवीन चेहरांना संधी देण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta