बेंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागा आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी ११३ हा जादुई आकडा गाठावा लागणार आहे.
राजकीय समीकरणे ही राज्यातील विभागांप्रमाणे वेगवेगळी आहेत. मात्र काँग्रेसमध्ये आतापासूनच मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत सुरू झाली असून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधान केलं आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी गुरुवारी म्हटलं की, मे महिन्यात होणाऱ्या आगामी कर्नाटक निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदासाठी मी १०० टक्के इच्छूक आहे.
मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा असलेले केपीसीसी प्रमुख डीके शिवकुमार यांच्याशी त्यांचे संबंध आणि निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी अशा विविध मुद्द्यांवर सिद्धरामय्या यांनी सखोल भाष्य केले.
“मी मुख्यमंत्री पदासाठी 100 टक्के इच्छुक आहे. आता परिस्थिती पाहता, मी, डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांमध्ये आहेत. पण जी. परमेश्वरा यांच्या इच्छेबद्दल मला माहिती नाही. मात्र त्यांनी भूतकाळात आपली महत्त्वाकांक्षा बोलून दाखवलेली आहे. त्यात काहीही चुकीचे नाही, असं सिद्धरमय्या म्हणाले.”
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना म्हैसूरमधील वरुणा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र बुधवारी त्यांनी कोलार मतदारसंघातून कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला.
डीके शिवकुमार यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल विचारले असता सिद्धरामय्या म्हणाले, “काँग्रेस पूर्णपणे एकसंध आहे. तेही इच्छुकांपैकी एक आहेत. त्यात काहीही चुकीचे नाही. शेवटी निवडून आलेल्या आमदारांना विधिमंडळाचा नेता ठरवावा लागेल.”