Wednesday , December 10 2025
Breaking News

कोट्यावधीची रोकड, सोन्या, चांदीचे दागिने जप्त

Spread the love

 

निवडणुक आचारसंहितेचा बडगा

बंगळूर : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने अनियमितता रोखणे, राज्यभर चेकपोस्ट उभारणे, वाहनांची तपासणी कडक करणे यावर करडी नजर ठेवली आहे. कागदपत्रे नसलेली अनधिकृत रक्कम आणि मतदारांना देण्यासाठी गोळा केलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या आहेत.
कोप्पळ, उत्तर कन्नड आणि तुमकूर जिल्ह्यात आज पोलिसांनी चांदीच्या वस्तू आणि पैसे जप्त केले. उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील सर्पनकट्टे चेक पोस्टवर आज १४ लाख रुपयांची कागदपत्रे नसलेली रक्कम जप्त करण्यात आली. भटकळ शहर पोलिसांनी यशवंतगोंडा, होन्नावरचे श्रीनिवास गौडा आणि रघुनायक यांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

चिक्कमंगळूरात १७ किलो सोने जप्त
शुक्रवारी चिक्कमंगळूरच्या तरिकेरे येथील एमसी हळ्ळी चेकपोस्टवर एका लॉजिस्टिक वाहनात ६.४४ कोटी रुपये किमतीचे सुमारे १७ किलो सोने सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सोने सिक्वेल लॉजिस्टिकच्या वाहनात सापडले आहे. या संबंधात कोणतीच कागदपत्रे सापडलेली नाहीत. तरिकेरे पोलिस ठाण्यात प्रकरण नोंद झाले आहे.
कोप्पळमध्ये, हुबळीहून कोप्पळला चांदी आणि पैसे आणणाऱ्या दोन व्यावसायिकांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्याकडून ९.६७ लाख रुपये किमतीची चांदी आणि १.१० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलिसांनी व्यापारी कैलास जैन आणि देवीचंद्र जैन यांना अटक करून चौकशी करून नंतर सोडून दिले.

तुमकूरमध्ये एलईडी बल्ब जप्त
फिरत्या निवडणूक दक्षता पथकाने तुमकूर जिल्ह्यातील तिपटूर तालुक्यातील बंडीहळ्ळी चेकपोस्टवर ट्र्कमधून नेण्यात येत असलेले ६.८४ लाख रुपये किमतीचे एलईडी बल्ब जप्त केले आहेत. याप्रकरणी तिपटूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बंगळूरमध्येही ऑपरेशन
दासरहळ्ळीचे धजदचे उमेदवार व विद्यमान आमदार आर. मंजुनाथ यांचे फोटो असलेले साडेआठ लाख रुपये किमतीचे ६१२ प्रेशर कुकर जप्त करण्यात आले आहेत. हे कुकर एका मिनी ट्रकमधून नेले जात होते, तर मतदारांना वाटण्यासाठी बीटीएम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अनिल शेट्टी यांच्या घरातून जीएसटी पथकाने कुकर आणि इतर वस्तू जप्त केल्या. या संदर्भात, निवडणूक अधिकारी वरलक्षम्मा यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोरमंगल पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
काल निवडणूक दक्षता अधिकाऱ्यांनी मुडीगेरे तालुक्यातील कोट्टीगेहर चेकपोस्टवर धर्मस्थळचे मंजुनाथस्वामी, कातेलू दुर्गापरमेश्वरी यांच्याकडून अडीच लाख रुपये जप्त केले. निवडणूक आचारसंहितेनुसार ५० हजारांपेक्षा जास्त पैसे घेता येणार नाहीत. त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. कुटुंबासह मंदिरात जात असताना पावगड येथील डॉक्टरच्या गाडीत ही रक्कम आढळून आली. तसेच गुरुवारीही याच कोट्टीगेहरजवळ अन्नपूर्णेश्वरी दर्शनाला जाणाऱ्या रामनगर येथील एका भाविकाकडून एक लाख रुपये जप्त करण्यात आले. १.४० कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
शिमोगा ते रंगेनहळ्ळी लक्कवल्ली पोलीस ठाण्यांतर्गत जाणार्‍या कारची एमएन कॅम्प चेकपोस्टवर तपासणी केली असता त्यात कागदपत्र नसलेले ३० लाख रुपये सापडले.
रामनगर जिल्ह्याच्या सीमेवरील कोलुरू गावाजवळ पोलिसांनी अवैधरित्या वाहतूक करत असलेला ३० टन तांदूळ आणि १.४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चन्नपट्टणच्या विविध भागात छापे घालून ५५ लीटर दारू जप्त करण्यात आली आहे. ही दारू बेकायदेशीररीत्या साठविण्यात आल्याचे सांगण्यात येते.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *