अनेकांचा बंडखोरीचा इशारा, बंडखोरी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
बंगळूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच बंडखोरीचा धुमाकूळ उठला आणि असंतोषाचा स्फोट झाला. भाजपचे तिकीट इच्छुक अनेक मतदारसंघात बंडखोरी करण्यासाठी पुढे सरसावले असून बंडखोरी शांत करण्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे.
उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर भाजपचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आपण राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. भाजपचे तिकीट न मिळाल्यास बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आपल्या वरिष्ठांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले आहेत. मंगळूरच्या सुळ्या मतदारसंघातून तिकीट गमावलेले मंत्री एस.एस. अंगारा यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आणि माजी मंत्री ईश्वरप्पा यांच्या मार्गाचा अवलंब केला. आपण राजीनामा देणार असल्याचे शंकर म्हणाले, ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
विश्वनाथ पाटील यांनीही भाजपचा राजीनामा जाहीर केला. होसदुर्गाचे विद्यमान आमदार गोळीहट्टी शेखर यांनी बंडखोरी केली आहे. कारण त्यांना तिकीट नाकारण्यात आले असून ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, रामदुर्गाचे आमदार महादेवप्पा यादव यांनीही तिकीट गमावल्याने नाराजी व्यक्त केली असून, बंडखोरी करण्याचा विचार असल्याचे म्हटले आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात संजय पाटील इच्छुक होते, परंतु तिकीट गमावल्याने तेही नाराज झाले असून, दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. ते त्यांच्या समर्थकांशी पुढील वाटचालीबाबत चर्चा केली आहे. तिकीट हुकलेले काही विद्यमान आमदार तर काही इच्छुक बंडखोरीच्या रांगेत उभे आहेत.
भाजपने १८९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यापैकी ९ विद्यमान आमदारांना तिकीट दिलेले नाही. काँग्रेस आणि धजद पक्षांनी भाजपमध्ये तिकीट गमावलेल्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले आहे. त्यांनी पक्षात प्रवेश केल्यास त्यांना तिकीट देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस आणि धजदच्या नेत्यांनीही असंतुष्टांशी चर्चा केली आहे.
भाजपचा राजीनामा जाहीर केलेले लक्ष्मण सावदी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेत्यांनी त्यांना तिकीट देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येते.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज कांही जणांशी चर्चा केली. बंडखोर म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे सांगणारे जगदीश शेट्टर ज्येष्ठांच्या भेटीनंतर आपली भूमिका बदलणार का, याची उत्सुकता आहे.
बंडखोरी शमवण्यासाठी सूत्रधार पक्षात
बंडखोरांचा असंतोष दूर करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत, खुद्द मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विद्यमान आमदार आणि तिकीट गमावलेल्या काही नेत्यांशी संपर्क साधला असून, आगामी काळात योग्य स्थानमान देऊ, असे सांगून त्यांनी बंडखोरांना स्पर्धा न करता सहकार्य करण्याचे आवाहन केले.
वरिष्ठांनी सर्व परिमाण लक्षात घेऊन तिकिटे दिली आहेत. तिकिटांपासून वंचित राहिलेल्यांना पक्षात योग्य तो दर्जा देऊ, असे आश्वासन देऊन त्यांची मनधरणी करण्याचे काम बोमई यांनी केले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही अनेक नेत्यांशी बोलून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्र्यांना विश्वास
तिकीट गमावलेल्या विद्यमान आमदारांशी आम्ही यापूर्वी अनेकदा बोललो आहोत. भविष्यात त्यांना योग्य दर्जा देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे बंडखोरी आणि असंतोष दूर होईल, असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला आहे.
दिल्लीहून परतल्यानंतर बंगळुरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजप हा राष्ट्रीय आणि शिस्तप्रिय पक्ष असून, बंडखोरी आणि अशांततेला सामोरे जाण्याची ताकद पक्षात आहे. तर, पक्षाच्या ज्येष्ठ आमदारांनी पक्षाला मोठे केले आहे. त्यांचे आणि पक्षाचे जवळचे संबंध असल्याने कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा नाराज असल्याची अटकळ आहे, येडियुरप्पा तीन दिवस दिल्लीत होते, सर्व बैठकांमध्ये सहभागी झाले होते, निवडीमध्ये पूर्ण सहभाग होता, असे बोम्मई म्हणाले.
भाजपच्या उमेदवारांची यादी पुढील विजयाचा होकायंत्र आहे. काँग्रेस आणि धजदच्या उमेदवारांच्या यादीच्या तुलनेतआमचे उमेदवार चांगले आहेत. १८९ उमेदवारांच्या या यादीत आम्हाला बहुमत मिळेल, असे ते म्हणाले.
उर्वरित ३५ मतदारसंघातील उमेदवार येत्या दोन-तीन दिवसांत निश्चित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
शंकर यांचा राजीनामा
तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले विधान परिषदेचे सदस्य आर. शंकर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला.
राणेबेन्नूर भाजपचे तिकीट इच्छुक आर. शंकर यांच्याऐवजी विद्यमान आमदार अरुण कुमार यांना तिकीट दिल्याने त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
आर. शंकर यांनी अध्यक्ष बसवराज होरट्टी यांच्याकडे राजीनामा पत्र सुपूर्द केले. त्यांनी अपक्ष म्हणून अधिकृतपणे रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta