बंगळुरू : भाजप विरोधी पक्षांची बहुचर्चित बैठक आज (दि.१८) बंगळूर येथे होत आहे. या बैठकीत सहभागी झालेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सेवेसाठी काँग्रेस सरकारने राज्यातील ३० आयएएस अधिकारी तैनात केले आहेत, असा गंभीर आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे नेते कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्य सरकारने आयएएस मजदुरी नीती अशी योजना सुरु केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
… हा तर सत्ताधारी काँग्रेस पक्षाचा उद्दामपणा
कुमारस्वामी म्हणाले की, कर्नाटकमधील आयएएस अधिकारी हे राज्याच्या क्षमतेचे आणि कार्यक्षमतेचे प्रतीक आहेत. या अधिकाऱ्यांना राजकारण्यांची सेवा करण्यासाठी द्वारपाल म्हणून नियुक्त करणे हे अखिल भारतीय सेवा (आचार) नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे. आयएएस अधिकारी राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. या अधिकाऱ्यांना राजकारण्यांच्या सेवेसाठी ‘गेटकीपर’ म्हणून तैनात करणे हे सत्ताधारी पक्षाचा उद्दामपणा दर्शवते.मला आश्चर्य वाटले की, या अधिकाऱ्याने आपला स्वाभिमान आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल हे माहीत असताना हे काम करायला तयार केले. असा वादग्रस्त आदेश देणारे मुख्य सचिव जनतेला उत्तरदायी असल्याचे ते म्हणाले.
अधिकाऱ्यांची नावे उघड केली
एका ट्विटमध्ये कुमारस्वामी यांनी नेत्यांच्या मेजवानीसाठी नियुक्त केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या नावांची यादी शेअर केली. आघाडीकरून सत्ता मिळवण्याच्या लालसेपोटी काँग्रेसने कर्नाटकचा स्वाभिमान, वारसा आणि स्वाभिमानावर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसच्या कर्नाटक युनिटने आघाडीच्या नेत्यांची सेवा करण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करून चूक केली आहे. शब्द आणि कृतीत फरक नसणे हेच त्याला म्हणायचे आहे का?, असा सवालही त्यांनी केला आहे.
साडेसहा कोटी जनतेचा अपमान
विरोधी पक्षांची बैठक हा राज्य सरकारचा कार्यक्रम नव्हता. तसेच हा काही सरकारचा शपथविधी सोहळाही नव्हता. ही विरोधी पक्ष नेत्यांची बैठक होती. या नेत्यांना मेजवानी देण्याची जबाबदारी आयएएस अधिकार्यांवर सोपवणे हा घोर अन्याय असून, हा कर्नाटक राज्यातील साडेसहा कोटी जनतेचा अपमान आहे, असेही कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta