दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी उपाययोजना
बंगळूर : ढग रोपणाची (क्लाउड सीडिंग) प्रभावीता अद्याप सिद्ध झालेली नाही, परंतु तरीही, कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
सोमवारी म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “क्लाउड सीडिंगवर मंत्रिमंडळ उपसमिती आहे, ज्याची यापूर्वीच बैठक झाली आहे. बैठक पुन्हा होत आहे. त्याची कार्यवाही मंत्रिमंडळासमोर चर्चेसाठी ठेवण्यात येईल.”
ते म्हणाले, “राज्यातील कोणते जिल्हे दुष्काळग्रस्त आहेत हे जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारकडे मदतीसाठी विनंती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारचे एक पथक येऊन पाहणी करेल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ) मधून मदत देण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत निर्णय घेईल.
तालुके अवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर आम्ही दुष्काळ निवारण कार्यक्रम राबवू. तेथील लोकांना काम आणि रोजगार देण्यासाठी सरकार कार्यक्रम सुरू करणार असल्याचे ते म्हणाले..
बुधवारी गृहलक्ष्मी
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसची चौथी हमी गृहलक्ष्मी योजना ३० ऑगस्ट रोजी म्हैसूरमध्ये जारी केली जाईल. म्हैसूर, हसन, चामराजनगर आणि कोडगु जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक लोक म्हैसूरमधील या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही पाच हमीयोजना जाहीर केल्या होत्या आणि त्यापैकी तीन आम्ही औपचारिकपणे सुरू केल्या आहेत. गृह लक्ष्मी ही संपूर्ण राष्ट्रातील एक मोठी योजना आहे, ज्याचे अनुकरण इतर राज्य सरकारे आणि इतर पक्षांकडून केले जात आहे,” असे ते म्हणाले.
सिद्धरामय्या म्हणाले, “गृहलक्ष्मीला वर्षाला ३२ हजार कोटी रुपयांची गरज आहे आणि १.३२ कोटी कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. महिला कुटुंबप्रमुखांना दरमहा दोन हजार रुपये दिले जातील. फक्त या वर्षी १८ हजार कोटी रुपयांची गरज आहे, कारण चार महिने आधीच झाले आहेत. पाच हमी योजनातून प्रत्येक कुटुंबाला दरमहा सुमारे पाच हजार रुपये मिळतील. यामुळे लोकांची खरेदी क्षमता वाढेल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे जीडीपीही वाढेल आणि रोजगारही निर्माण होतील.”
बेळगावहून म्हैसूरला कार्यक्रम हलवल्याच्या प्रतिक्रियेवर ते म्हणाले की, यामागे कोणतेही विशेष कारण नाही. त्याची अंमलबजावणी सर्व जिल्ह्यांत होणार आहे. पण, राज्यस्तरीय कार्यक्रम म्हैसूर येथे होत आहे, असे ते पुढे म्हणाले.
राज्यात भाजपचे दिवाळे
राज्यात भाजप दिवाळखोरीत निघाले आहे. सत्तेत येऊन शंभर दिवस उलटले तरी विरोधी पक्षनेता निवडता येत नाही, अशी खिल्ली मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उडविली. म्हैसूरमध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, इतिहासात विरोधी पक्षांनी राज्यात इतकी अनुकूल परिस्थिती पाहिली नाही.
Belgaum Varta Belgaum Varta