बंगळूर : एकीकडे कर्नाटकाचा राज्योत्सव सर्वत्र साजरा होत असतानाच स्वतंत्र कल्याण कर्नाटक राज्याची मागणी करून वेगळ्या राज्याचा झेंडा फडकावण्याचा प्रयत्न राज्य आंदोलन समितीने आज गुवबर्गा येथे केला. परंतु आंदोलन समितीचे अध्यक्ष एम. एस. पाटील यांच्यासह आंदोलन समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
बुधवारी (ता. १) सकाळी शहर जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाजवळील सरदार वल्लभभाई पटेल सर्कलपर्यंत मोर्चा काढून कार्यकर्त्यांनी स्वतंत्र राज्याच्या घोषणा देण्यास सुरवात केली. त्यांनी चौकात स्वतंत्र राज्याचा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न केला असता त्याना रोखण्यात आले. तरीही कार्यकर्त्यांनी आपला आग्रह सोडला नाही.
स्वतंत्र कल्याण कर्नाटक नावाने वेगळ्या राज्याचा झेंडा फडकावणाऱ्या आंदोलन समितीचे अध्यक्ष एम. एस. पाटील नरीबोळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
कल्याण कर्नाटक स्वतंत्र राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष एम. एस. पाटील नरीबोळ, विनोदकुमार जनवरी, उदयकुमार जेवर्गी, लक्ष्मीकांत स्वादी, शरणगौड पोलीस पाटील नरीबोळ, नागराज बाली, रवि हूगार, डॉ. राजशेखर बांडे, गौतम ओंटी, सुमा पाटील, शमिना बेगम, महादेवी हेळवार, संतोष पाटील, सुनील शिर्खे यांच्यासह इतरांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले.
कलम ३७१ जेची संपूर्ण अंमलबजावणी करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष, मंत्रीमंडळ, निगम व महामंडळ नियुक्तीत २५ टक्के कोटा देण्याकडे दुर्लक्ष, बंगळूरपासून ५०० किलोमीटर दूर असलेल्या गुलबर्गा शहराला उपराजधानीचा दर्जा देण्यास नकार, कल्याण कर्नाटक विभागातील विविध योजनांचे अन्य जिल्ह्याकडे स्थलांतर यासह विविध समस्या समोर ठेऊन स्वतंत्र राज्याची आम्ही कित्येक वर्षापासून करीत असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
पुढील काळात तेलंगणाप्रमाणे स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी आंदोलन उग्र करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta