भाजप नेत्यांकडून कारवाईचे संकेत; सोमशेखर यांचे क्रॉस व्होटिंग, हेब्बार मतदानास अनुपस्थित
बंगळूर : भाजपपासून अंतर राखणारे आणि अनेकदा काँग्रेस नेत्यांसोबत दिसणारे यशवंतपूरचे भाजप आमदार एस. टी. सोमशेखर यांनी भाजपचा व्हीप धुडकावून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास क्रॉस व्होटिंग केले. तर भाजपचे दुसरे आमदार शिवराम हेब्बार (यल्लापूर) यांनी मतदानच केले नाही. त्यामुळे या दोन्ही आमदारांनी भाजप – धजद युतीला मोठा धक्का दिला आहे. भाजप नेत्यांनी याबद्दल संताप व्यक्त करून कारवाईचे संकेत दिले आहेत.
आवश्यक काँग्रेसच्या पाच आमदारांची मते फोडण्याच्या उद्देशाने धजदने भाजपच्या मदतीने पाचवा उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. त्यामुळेच आज निवडणुक झाली. परंतु काँग्रेस नेते आपल्या पक्षाच्या आमदारांना पक्षाशी एकनिष्ठ ठेवण्यात यशस्वी ठरले. उलट भाजपच्या दोन आमदारांना पक्षाविरुध्द उभे करण्यात ते यशस्वी ठरले. मुख्यमंत्री सिध्दरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. चंद्रशेखर यांचे रणतंत्र पुन्हा एकदा यशस्वी ठरले.
भाजप आमदार एस. टी. सोमशेखर यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांला मतदान केले. भाजपच्या निवडणूक प्रतिनिधीने सोमशेखर यांनी काँग्रेसला क्रॉस व्होटिंग केल्याची पुष्टी केली.
मतदानापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमशेखर म्हणाले, “मी ११ वर्षांपासून सर्वांना मतदान केले आहे. पण जे राज्यसभेवर निवडून आले त्यांनी मला एक रुपयाही दिला नाही. मी तुम्हाला थेट सांगेन, मी विवेकबुद्धीने मतदान करेन. गेल्या वेळी मी (वर्तमान अर्थमंत्री) निर्मला सीतारामन यांना मतदान केले होते. त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी मला भेटण्याची वेळही दिली नाही, असे ते म्हणाले.
जे मला आश्वासन देतील त्याना मी माझे मत देईन. मी सांगितल्याप्रमाणे मतदान करीन. ५ कोटी रुपये अनुदान येईल. पण ते आम्हाला देतात का? ते म्हणाले की, मी तिथे (विधीमंडळात) प्रामाणिकपणे जाऊन मतदान करणार आहे.
मतदानानंतर बोलताना एस.टी.सोमशेखर म्हणाले, “मी माझ्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार मतदान केले आहे. मी नियमानुसार एजंटला मतदान करून दाखवले आहे. आमदारपदाचा राजीनामा देण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.
सोमशेखर यांच्यावर कारवाई
एस. टी. सोमशेखर यांनी क्रॉस व्होटिंग केल्याची पुष्टी देणारे चीफ व्हीप दोडण्णागौडा पाटील म्हणाले की, सोमशेखर यांचे हे पाऊल पक्षविरोधी कृती आहे आणि त्यांना सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यासाठी ते त्यांच्याविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार आहेत.
नेत्यांचा आक्रोश
भाजप आमदार एस. टी. सोमशेखर यांच्या क्रॉस व्होटिंगची माहिती समोर येताच भाजप आणि धजदचे नेते सोमशेखर यांच्याविरोधात एकत्र आले. त्यांच्यावर कारवाई करण्याची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे आमदार सोमशेखर यांच्या क्रॉस व्होटिंगमुळे भाजप वर्तुळात नाराजी पसरली असून त्यांच्यावर काय कारवाई करायची यावर भाजप आणि धजदच्या नेत्यांनी विधानसौध येथील विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात बैठक घेतली.
माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, एच.डी. कुमारस्वामी, विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह अनेक नेत्यांनी या बैठकीत सहभाग घेऊन सोमशेखर यांच्यावर काय कारवाई करता येईल यावर चर्चा केल्याचे सांगण्यात येते.
पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केल्याबद्दल सोमशेखर यांची पक्षातून हकालपट्टी करायची की त्यांना निलंबित करायचे, त्यांच्याविरोधात अध्यक्षांकडे तक्रार करायची किंवा त्यांचे सदस्यत्व अपात्र ठरवण्यासाठी कायदेशीर कारवाई करायची यावरही नेत्यांनी चर्चा केली.
धजदचे सर्व १९ आमदार मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे स्पष्ट झाले. नाराज आमदार शरणगौडा कंदकूर यांच्या वाटचालीविषयी राजकीय वर्तुळात औत्सुक्य होते. परंतु त्यांनी अखेर आपल्या पक्षाच्या उमेदवारालाच मतदान केले.
मुख्यमंत्र्यांकडून आभार
भाजपचे आमदार एस. टी. सोमशेखर यांनी कॉंग्रेस उमेदवाराला मतदान केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. पत्रकारांनी या संदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केले असते तर सोमशेखर यांचे आभार मानले असते, असा टोला लगावला.
हेब्बार मतदानापासून दूर
भाजपचे आमदार सोमशेखर यांच्याप्रमाणेच काँग्रेसच्या नेत्यांशी जवळीक असलेले भाजपचे यल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बार हे काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण ते मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदानालाच आले नाहीत. हाही भाजपला एक धक्काच मानला जात आहे.
आमदार भवनातील शिवराम हेब्बार यांच्या कार्यालयाच्या दारावर विरोधी पक्षाचे मुख्य व्हीप दोडण्णागौडा पाटील यांनी भाजप उमेदवाराला मतदान करण्यासाठी व्हीपची प्रत चिकटवून व्हीप लागू केला होता.
विशेष म्हणजे भाजपच्या एका आमदारासह पाच अपक्ष आमदारांनी मतदान केले. भाजपचे माजी मंत्री, खाणसम्राट व विद्यमान आमदार जनार्दन रेड्डी यांनीही कॉंग्रेस उमेदवारालाच नियोजनानुसार मतदान केले.
पक्षवार झालेले मतदान
काँग्रेस – काँग्रेस आमदार १३४, अपक्ष आमदार ४, भाजप (क्रॉस व्होट) १ (एकूण १३९)
भाजप – ६४
धजद – धजद आमदार १९, भाजप १६ (एकूण ३५)