

बेळगाव : रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी कपिलेश्वर मंदिराच्या पाठीमागील तलावात एक दुर्घटना घडली, त्यामध्ये पोहायला गेलेल्या दोन 7 व 10 वर्षे वय असलेल्या चिमुकल्यांचा कठडा कोसळून बळी गेला. या जीर्ण झालेल्या विहिरीत अनेकजण आत्महत्याही करतात व काही निष्पापांचे बळीही जात आहेत,
नागरिकांतून प्रश्न विचारला जात आहे की याला जबाबदार कोण? ही जागा गोडसे कुटुंबियांच्या मालकीची होती पण त्यांनी ती बेळगाव महानगर पालिकेकडे हस्तांतरित केली आहे असे त्यांचे म्हणणे आहे, 2016 व 2022 ला ही प्रक्रिया जर झाली असेल तर हस्तांतर का रखडले व महानगर पालिका प्रशासन आपली जबाबदारी का झटकत आहे यासाठी गोडसे कुटुंबीय, युवा समिती सीमाभाग तसेच इतर नागरिकांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन या तलाव संदर्भात महानगर पालिका प्रशासनाला सूचना करून पुढील कार्यवाही पूर्ण करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत महानगर पालिकेच्या अभियंत्या श्रीमती लक्ष्मी निप्पाणीकर यांना फोनवरून हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर या संदर्भात लवकरात लवकर तलाव पुनर्बांधणी व डागडुजीसाठी खर्च व नकाशा तसेच तपशील गुरुवार दिनांक 7 मे पर्यंत सादर करण्याच्या सूचना केल्या तसेच राज्य आपत्कालीन निधीतून निधी उपलबध करण्याच्याही सूचना केल्या. या कपिलतीर्थ परिसराचा महानगर पालिका अधिकाऱ्यांच्या सोबत लवकरच प्रत्यक्ष पाहणी दौरा करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
या निवेदन व चर्चेवेळी गोडसे कुटुंबियांच्या वतीने व्यंकटेश गोडसे, श्रीकांत गोडसे उपस्थित होते, तसेच जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले, युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta