Wednesday , August 19 2026
Breaking News

रविवारी काव्य लेखन कार्यशाळेला मान्यवरांची उपस्थिती

Spread the love

 

बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी १०.३० वाजता मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात काव्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य, कविता आणि सर्जनशील लेखनाची आवड असलेल्या नवोदित कवी, विद्यार्थी व रसिकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.

कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणप्रेमी सुभाष ओऊळकर यांच्या हस्ते होणार असून, समकालीन मराठीतील ख्यातनाम कवी अजय कांडर आणि ज्येष्ठ पत्रकार, कवी व लेखक विजय चोरमारे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यशाळेत कविता म्हणजे काय, कवितेचे स्वरूप व प्रकार, मराठी कवितेचा प्रवास, आधुनिक मराठी कविता, कवितेची निर्मिती प्रक्रिया, दर्जेदार कवितेची वैशिष्ट्ये, प्रभावी कविता लेखनाची तंत्रे, प्रात्यक्षिक, प्रश्नोत्तरे, शंका निरसन आणि खुली चर्चा अशा विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

समकालीन मराठी कवितेतील महत्त्वाचे नाव असलेल्या अजय कांडर यांच्या आवानओल, हत्ती इलो, युगानुयुगे तूच आणि अजूनही जिवंत आहे गांधी या कवितासंग्रहांना मोठी लोकप्रियता लाभली आहे. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला असून त्यांच्या कवितांचे विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. तसेच अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश करण्यात आला असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनांमध्ये त्यांनी मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे.

प्रसिद्ध पत्रकार, कवी आणि लेखक विजय चोरमारे यांनी १९८७ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. दैनिक सकाळ, लोकमत, प्रहार आणि महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. पापण्यांच्या प्रदेशात, शहर मातीच्या शोधात, आतबाहेर सर्वत्र आणि स्तंभसूक्त हे त्यांचे गाजलेले कवितासंग्रह असून पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.

कविता लेखनाची आवड असलेल्या नवोदित कवी, साहित्य अभ्यासक, विद्यार्थी तसेच रसिकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गुड्स शेड रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन

Spread the love  बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणाऱ्या प्रमुख गुड्स शेड रस्त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *