Saturday , June 27 2026
Breaking News

अंगणवाड्यांतील एलकेजी-युकेजी उपक्रम अजूनही रखडला; सरकारी शाळांच्या पटसंख्येवर परिणाम

Spread the love

 

बेळगाव : सरकारी शाळांतील घटती पटसंख्या रोखण्यासाठी आणि बालशिक्षण अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने कर्नाटक सरकारने अंगणवाडी केंद्रांमध्ये मॉन्टेसरी, एलकेजी आणि युकेजी वर्ग सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा केली होती. मात्र, दोन वर्षे उलटूनही हा उपक्रम राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात आलेला नसल्याचे चित्र आहे.

जून २०२४ मध्ये अंगणवाडी केंद्रांचे उन्नतीकरण करण्याच्या उद्देशाने एलकेजी व युकेजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी शासनाने प्रशासकीय मान्यताही दिली होती. तथापि, हा उपक्रम राज्यातील केवळ सुमारे २५० निवडक अंगणवाडी केंद्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात असून बहुतांश केंद्रांमध्ये अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

अंगणवाडी केंद्रांमध्ये स्वतंत्र वर्गखोल्यांचा अभाव, खेळासाठी जागेची कमतरता, शैक्षणिक साहित्याचा तुटवडा तसेच प्रशिक्षित शिक्षकांची उपलब्धता नसल्यामुळे एलकेजी-युकेजी वर्ग सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती मिळालेली नाही. परिणामी, सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय कागदावरच राहिल्याची टीका होत आहे.

सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी अंगणवाडी स्तरावरच एलकेजी व युकेजी वर्ग सुरू करणे आवश्यक असल्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा केली आहे. तसेच, सरकारी शिक्षण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नवीन खाजगी शाळा व कॉन्व्हेंटना परवानगी देण्याबाबतही पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे सरकारकडे केली आहे.

बालशिक्षणाचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. आवश्यक पायाभूत सुविधा, शैक्षणिक साहित्य आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देत हा उपक्रम राज्यभर तातडीने राबविण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी तसेच शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

घुमटमाळ मारुती मंदिर आणि बांडगी शैक्षणिक ट्रस्टतर्फे विद्यार्थिनींचा सत्कार

Spread the love  बेळगाव : “मुलींनो जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर डोळसपणे प्रेम करा, आपल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *