Wednesday , August 19 2026
Breaking News

हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामामुळे येळ्ळूर ग्रामस्थ त्रस्त; जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास

Spread the love

 

बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे येळ्ळूर गावातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अवजड वाहनांची दिवसरात्र सुरू असलेली वाहतूक, खराब झालेला मुख्य रस्ता आणि धुळीचे साम्राज्य यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असून शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, बायपासच्या कामासाठी वापरली जाणारी अवजड वाहने गावातून भरधाव वेगाने धावत असल्याने अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः गावात केवळ एकच मुख्य रस्ता असून त्याच मार्गावरून सुमारे सात शाळांमधील विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे लहान मुलांना दररोज जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे गावातील मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्यात पाणी साचत आहे. त्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गावात एखादी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी संबंधित बायपास रस्त्याच्या कंत्राटदाराने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावातील रस्ता त्वरित दुरुस्त करून अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशीही त्यांची मागणी आहे.

येत्या दोन दिवसांत ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही, तर गावातून जाणारी बायपास कामाची वाहने अडवून संबंधित कंत्राटदाराला जाब विचारण्यात येईल, असा इशारा येळ्ळूर ग्रामस्थ, पंचायत समिती सदस्य आणि नागरिकांनी दिला आहे.

ग्रामस्थांनी प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराने तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी मराठा मंडळमध्ये नागपंचमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मराठा मंडळ संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *