Friday , August 21 2026
Breaking News

पतीच्या दीर्घायुष्यासोबत वडाच्या दीर्घायुष्यासाठीही प्रार्थना; सान्सी महिला मंडळाचा पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

Spread the love

 

बेळगाव : हिंदू संस्कृतीनुसार पतीला दीर्घायुष्य लाभावे, या श्रद्धेने वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. मात्र अन्नपूर्णेश्वर नगरातील सान्सी महिला मंडळाने या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची अर्थपूर्ण जोड देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. वडाचे रोपटे लावून त्याचे वर्षभर संगोपन करणे आणि दरवर्षी त्याच वृक्षाची पूजा करण्याचा अनोखा उपक्रम महिलांनी यशस्वीपणे राबविला आहे.

गतवर्षी महिला मंडळातील सदस्यांनी एकत्र येत वडाच्या रोपट्याची लागवड केली. केवळ लागवड करून न थांबता, वर्षभर नियमित पाणी देणे, खत घालणे आणि त्याची काळजी घेऊन रोपट्याचे संगोपन केले. या जिव्हाळ्याच्या प्रयत्नांमुळे रोपट्याने चांगली वाढ केली असून, यंदा सलग दुसऱ्या वर्षी त्याच वडाच्या वृक्षाची विधिवत पूजा करून वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

वाढती वृक्षतोड, घटते हरितक्षेत्र आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास ही आजची गंभीर समस्या आहे. अशा काळात केवळ वडाच्या झाडाची पूजा करण्यापेक्षा त्याचे संरक्षण आणि संवर्धन करणे हीच खरी पूजा असल्याचा संदेश सान्सी महिला मंडळाने आपल्या कृतीतून दिला आहे.

“ज्या वडाच्या झाडाकडे आपण पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, त्या वडालाही दीर्घायुष्य लाभावे,” या उदात्त भावनेतून सुरू झालेला हा उपक्रम श्रद्धा, संस्कृती आणि पर्यावरण संरक्षणाचा सुंदर संगम ठरला आहे. परंपरेचे जतन करत पर्यावरणाबद्दलची सामाजिक जबाबदारी अधोरेखित करणारा हा उपक्रम परिसरात सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, इतर महिला मंडळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

About Belgaum Varta

Check Also

चनम्मा नगर, उद्यमबाग परिसरात खुलेआम गांजाची विक्री; उचगावच्या तरुणाला बेड्या

Spread the love  १ किलो २१२ ग्रॅम गांजासह मोटारसायकल, मोबाईल जप्त; १.०३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *