Friday , August 21 2026
Breaking News

रिमझिम पावसात भक्तिभावाचा दरवळ; वटपौर्णिमेनिमित्त मंदिर परिसरात सुवासिनींची गर्दी

Spread the love

 

बेळगाव : पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी केले जाणारे हिंदू संस्कृतीतील पवित्र वटपौर्णिमा व्रत सोमवारी जिल्हाभर मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरे करण्यात आले. रिमझिम पावसाची सतत हजेरी असूनही पारंपरिक वेशभूषा, नटलेला साज-शृंगार आणि हातात पूजेचे साहित्य घेऊन सुवासिनींनी मंदिर परिसर गाठत वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली. त्यामुळे शहरातील विविध मंदिर परिसर धार्मिक वातावरणाने भारावून गेले होते.

पौराणिक मान्यतेनुसार सावित्रीने आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळविले. या आदर्शातून प्रेरणा घेत सुवासिनी सात जन्मी हाच पती लाभावा, पतीला निरोगी, दीर्घ आणि सुखी आयुष्य लाभावे, अशी मनोभावे प्रार्थना करत वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालत व्रताचे पालन करतात. दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक असलेल्या वडाच्या पूजनाने वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले.

कपिलेश्वर मंदिर, महाद्वार रोड येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर, गोवावेस परिसरातील मंदिर, वडगाव येथील मंगाई मंदिर तसेच शहरातील विविध वडाच्या झाडांजवळ सकाळपासूनच महिलांची मोठी गर्दी उसळली होती. अनेक सुवासिनींनी एकमेकींची ओटी भरत शुभेच्छांची देवाणघेवाण केली. नोकरी व व्यवसाय करणाऱ्या महिलांनीही वेळेचे नियोजन करत घरच्या घरी वडाच्या रोपट्याची पूजा करून परंपरा जपली.

भक्ती, श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या या सोहळ्याने शहरातील धार्मिक वातावरण अधिकच मंगलमय झाले.

सेल्फीचा उत्साहही कायम

धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर आठवणी कायमस्वरूपी जपण्यासाठी महिलांमध्ये सेल्फी आणि समूह छायाचित्रांचा उत्साहही ओसंडून वाहताना दिसला. पारंपरिक पेहरावातील सुवासिनींनी मंदिर परिसरात आणि वडाच्या झाडाजवळ कुटुंबीय व मैत्रिणींसह छायाचित्रे टिपत वटपौर्णिमेच्या अविस्मरणीय क्षणांना कॅमेऱ्यात बंदिस्त केले.

About Belgaum Varta

Check Also

फाउंड्री क्लस्टरमध्ये गांजाची विक्री; उचगावच्या तरुणाला बेड्या

Spread the love  १ किलो २१२ ग्रॅम गांजासह मोटारसायकल, मोबाईल जप्त; १.०३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *