Friday , August 21 2026
Breaking News

नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा

Spread the love

 

पुणे : राज्यभर संतापाची लाट निर्माण करणाऱ्या नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व निर्घृण हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (६५) याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने केलेला गुन्हा “दुर्मीळातील दुर्मीळ” स्वरूपाचा असल्याचे नमूद करत न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला.

अंतिम निकाल देताना न्यायालयाने आरोपीविरोधातील वैज्ञानिक व परिस्थितीजन्य पुरावे भक्कम असल्याचे स्पष्ट केले. तपास यंत्रणांनी गुन्ह्यातील प्रत्येक दुवा सिद्ध केला असून आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही गंभीर असल्याचे न्यायालयाने नमूद केले. केवळ स्वतःची वासना शमवण्यासाठी निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने कोणतीही दया दाखवण्यास नकार दिला.

या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांनी युद्धपातळीवर करत अवघ्या १५ दिवसांत सुमारे १,२०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. विशेष न्यायालयात ५० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. दैनंदिन सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अवघ्या ५८ दिवसांत निकाल लागल्याने राज्याच्या न्यायव्यवस्थेतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

आरोपीवर भारतीय न्याय संहितेतील अपहरण, बलात्कार, खून तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने सर्व आरोप सिद्ध झाल्याचे मान्य करत आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

About Belgaum Varta

Check Also

अमरावतीत आंबोली पब्लिक स्कूलच्या एनसीसी कॅडेट्सची सुवर्ण कामगिरी; राष्ट्रीय थल सैनिक शिबिरासाठी निवड

Spread the love  रायफल शूटिंगमध्ये सार्जंट श्रीपाद तार्लेकर यांना सुवर्णपदक; CQMS राज बागवे यांचीही राष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *