Tuesday , June 30 2026
Breaking News

सुर्ल (सुरल) धबधब्यात बुडालेल्या बेळगावच्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Spread the love

 

बेळगावच्या रेस्क्यू पथकाच्या अथक प्रयत्नांना यश; मुसळधार पावसामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी

खानापूर : गोव्यातील सत्तरी तालुक्यातील सुर्ल (सुरल) धबधब्यात बुडालेल्या बेळगावच्या 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह सोमवारी (29 जून) अखेर शोधून बाहेर काढण्यात आला. मुसळधार पाऊस, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे शोधमोहीम अत्यंत आव्हानात्मक ठरली होती. अखेर बेळगावच्या रेस्क्यू पथकाच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले.

मृत तरुणाची ओळख आदित्य दीपककुमार सत्पती (वय 20) अशी झाली आहे. आदित्य हा मित्रांसमवेत सहलीसाठी सुर्ल धबधब्यावर गेला होता. म्हादई अभयारण्य परिसरातील धबधबा पाहताना तो पाण्यात उतरला. मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला.

घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलीस, म्हादई अभयारण्याचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रविवारी सायंकाळपर्यंत शोधमोहीम सुरू होती. मात्र मुसळधार पाऊस, वाढलेला पाण्याचा प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे रात्री शोधकार्य स्थगित करण्यात आले.

सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी बेळगावच्या सामाजिक कार्यकर्ते व रेस्क्यू पथकातील अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, विक्की मेहता, शुभम हुली, मायकल पिंटो, रोशन तनावडे आणि आकाश यांनी स्थानिक यंत्रणांच्या सहकार्याने अनेक तास अथक प्रयत्न करत आदित्यचा मृतदेह बाहेर काढला. पाण्यात दीर्घकाळ राहिल्यामुळे आणि माशांमुळे मृतदेहाचा चेहरा विद्रूप झाल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

आदित्य हा मूळचा ओडिशा राज्यातील रहिवासी असून त्याचे कुटुंब सध्या बेळगाव येथे वास्तव्यास आहे. त्याचे वडील दीपककुमार सत्पती हे भारतीय नौदलातून निवृत्त झालेले अधिकारी आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून बेळगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

काळाच्या पाऊलखुणा: म. मं. ताराराणी कॉलेजमध्ये ई-निवडणुकीचा ‘डिजिटल पॅटर्न’ विद्यार्थिनींनी अनुभवली लोकशाहीची आधुनिक ताकद!

Spread the love  खानापूर : म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *