
तोडफोड करून रोकड-दागिने व २५ मेंढ्या लंपास
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील भरम्यानट्टी गावात मित्राच्या पत्नीसोबत पळून गेल्याच्या रागातून एका तरुणाच्या घरावर ५० हून अधिक जणांच्या सशस्त्र जमावाने धाडसी हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात घराची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली असून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि तब्बल २५ मेंढ्या लंपास झाल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बसप्पा नायक व त्यांची पत्नी नागव्वा आणि यल्लप्पा नायक हे तिघेही बेळगाव औद्योगिक परिसरातील एका खासगी कंपनीत एकत्र काम करत होते. कामाच्या ठिकाणी झालेल्या ओळखीतून यल्लप्पा आणि नागव्वा यांच्यात जवळीक निर्माण झाली. त्यानंतर दोघेही गावातून निघून गेल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
याच रागातून नागव्वाच्या माहेरचे तसेच पतीच्या नातेवाईकांनी ५० हून अधिक जणांचा जमाव जमवून यल्लप्पा नायक यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप आहे. तलवारी, कुऱ्हाडी, लोखंडी रॉड आणि काठ्या यांसारखी हत्यारे घेऊन आलेल्या जमावाने घरावरील कौले फोडली, टीव्ही, कपाटासह घरातील साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. घरातील वस्तूंची अक्षरशः मोडतोड करण्यात आली.
हल्ल्यावेळी यल्लप्पा नायक यांचे वृद्ध आई-वडील जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळाल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, हल्लेखोरांनी घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि २५ मेंढ्या घेऊन पलायन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे.
घटनेनंतर पीडित कुटुंबाने बेळगाव शहर पोलीस आयुक्तांकडे धाव घेत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी अधिकृतपणे गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली नसून पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta