Friday , August 21 2026
Breaking News

श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिरात सकल मराठा समाजातर्फे गाऱ्हाणे; समाज, शेतकरी आणि पावसासाठी सामूहिक प्रार्थना

Spread the love

 

बेळगाव : सर्व समाजबांधव, बळीराजा, शेती आणि राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार, २९ जून रोजी दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिरात पारंपरिक गाऱ्हाणे घालण्याचा धार्मिक कार्यक्रम भक्तीभावाने पार पडला.

या प्रसंगी देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील यांनी समस्त मराठा समाज आणि शेतकरी बांधवांच्या वतीने श्री कपिलेश्वराचे गाऱ्हाणे घातले. समाजातील सर्व घटकांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, बळीराजा सुखी व सुरक्षित राहावा, वेळेवर आणि समाधानकारक पाऊस पडून शेती बहरावी तसेच राज्यातील सर्वसामान्य जनतेचे जीवन आनंदी व समृद्ध व्हावे, अशी प्रार्थना करण्यात आली.

या कार्यक्रमाला बेळगाव देवस्थान पंच मंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, ज्येष्ठ नेते मालोजीराव आष्टेकर, सकल मराठा समाजाचे समन्वयक किरण जाधव, सागर पाटील, गुणवंत पाटील, महादेव चौगुले, कपिल भोसले, शरद पाटील, प्रकाश काळकुंद्रीकर, सुधाकर चाळके, शिवाजी हंगीरगेकर, शिवराज पाटील, विनायक हूलजी, राजन जाधव, पार्थ पाटील, गजानन मिसाळे, महेश लघाडे तसेच कपिलेश्वर मंदिर ट्रस्टचे सर्व सदस्य आणि मराठा समाजातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरलेल्या या कार्यक्रमात बेळगाव शहर व परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सामूहिक प्रार्थना आणि गाऱ्हाण्यामुळे श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

About Belgaum Varta

Check Also

कॅपिटल वन संस्थेला २१.६५ लाखांचा विक्रमी नफा; सभासदांना ८ टक्के लाभांश

Spread the love  बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *